पान:विश्व वनवासींचे.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ठाणे : वनवासी लोकसंस्कृती

 आपल्या भारतीय संस्कृतीचे अंत:प्रवाह भारतातील सर्व राज्यांमधून, राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यातून प्रवाहित झालेले आहेत. या संस्कृतीच्या प्रवाहात विविधता आहे, पण विषमता नाही. परिस्थिती आणि कालमानानुसार काही वेगळे बदल जाणवत असले तरी मूलस्रोत एकसंधच राहिला आहे. हा संस्कृती ओघ अखंडित प्रवाही आहे. फारतर त्या त्या ठिकाणचे जीवनमान आणि राहणीमान यात भिन्नता, वेगळेपण भरून राहिला आहे. या दृष्टीने आपण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांचा विचार केला असता प्रत्येक जिल्हा आपल्या विशेषांनी युक्त असतो. महाराष्ट्रातील वनवासी बहुल ठाणे जिल्हा आहे. या ठाणे जिल्ह्याचा एक अनोळखी आणि अदृश्य चेहरा आहे. त्याची मुद्दाम ओळख करून द्यावी लागते. ज्यांना ठाणे जिल्ह्याची ओळख आहे असे वाटते ते स्वत:च अनभिज्ञ असतात.

 प्रस्तुत ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील वनवासी पुरताच विचार करणार आहोत. ठाणे जिल्ह्याचे नागरी-शहरी स्वरूप शहरवासीयांना ठाऊक आहे. तथापि ठाणे जिल्ह्याचा बहुतांश भाग तसा अदृश्य आहे. तो चेहरा फारसा लोकांना माहिती नाही. औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाचा विचार, व्यापारी-शैक्षणिक भरभराट, लोकसंख्येची वाढ हे सगळं शहरी वातावरण नजरेत भरते. वाहतूक आणि दळण-वळण वेगही लक्षात येतो. पण याच ठाणे जिल्ह्याचा एक फार मोठा भाग वनवासी-गिरिजनांच्या वसाहतींनी व्यापला आहे. हे मात्र फारसे परिचित नाही.

 डहाणू, पालघर, वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा, शहापूर अशा सात तालुक्यांचा विस्तृत पट्टा हा वनवासी वस्तीचा ठाणे जिल्ह्यातील भाग आहे. आता पालघर तालुक्याचा तेवढ्यासाठीच स्वतंत्र जिल्हा झाला आहे. या ठाणे जिल्ह्यात विक्रमगड, सूर्यानगर या सारखी महत्त्वाची गावे आहेत. वनवासी एक स्वतंत्र जिल्हा असावा म्हणून पालघर हे ठिकाण निवडले. शिवाय डहाणू ते नाशिक अशी एक रेल्वे खेळविल्यास या भागाचे दळण-वळण वाढेल आणि वनवासी

५८
विश्व वनवासींचे