पान:विश्व वनवासींचे.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'उगवती', पश्चिम दिशेला 'मावळती', ऋतुप्राप्तीचे वय असलेल्या स्त्रीला 'आंगळती', 'आक्रीत' म्हणजे विचित्र, अघटीत, चोरटे प्रेम व्यक्त करणाऱ्या युगुलांचे संकेत स्थळ 'गोडा दिवस' म्हणजे सोमवार आणि 'मोडा दिवस' म्हणजे मंगळवार अशीही अप्रतिम शब्दकळा, लोकपरिभाषा रूढ आहे.

 बोहडा, काज, कवळी, भाजी, मांदोळनाच, भक्तिगीत, लगीनगौरी गीत, भोंडल्या-टिपऱ्या नाच, मर्तिकनाच, तोरण बसविणे, डोंगरच्या मावल्या, तारपा नाच, ढोलनाच, हस्तकला यांचा समावेश या वनवासींच्या लोककला विचारात होतो.

 वनवासींच्या भाषेत महादेव किंवा शिव हाच 'डोंगरदेव' म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या गाभाऱ्यातील 'डोंगऱ्या' हे शिवस्थान आपण समजून घ्यावे लागते. महादेव-पार्वतीचा विवाह 'धवलगिरी'वर लागला त्यावेळी पाळलेली प्रथा म्हणून 'धवलगाणे' जे 'आडा', 'धवळी' स्त्री विवाह समयी म्हणतात ते थेट 'शिव-पार्वती'शी नाते सांगणारे आहे. वनवासींनी वेताळ, झोटींग, मावल्या, वाघोबा, हिरवा देव, म्हसोबा, कान्होबा, कणसरी, साती आसरा, मुंड्या, चेडा, वाघदेव या आपल्या देवता मानून त्यांना पूजेसाठी देव्हाऱ्यात स्थान दिले आहे.

 अवर्षण आणि ओला कोणताही दुष्काळ असो; वनवासी परस्परांना सहकार्य करतात. देणगी देता येत नसेल तर चांगले कार्य म्हणून श्रीमंत घरी मजुरी करून ते पैसे वळते करतात. गाईचे दूध वासरासाठी असते या भावनेने ते स्वत: कोरा काळा चहा पितात. वनौषधीचे उपचार परोपकार म्हणून करतात. मुलीच्या बापाला देहज देण्याची प्रथा आहे. हे धान्य, दागिने स्वरूपात दिले जाते अन्यथा त्या नवऱ्या मुलाला ‘घरोंदा' म्हणून काही वर्षे सासऱ्याच्या घरी शेतीत राबावे लागते. योग्य वेळी पैसे जमा झाल्यावर विवाह होतो पण तत्पूर्वी ते दाम्पत्य म्हणून एकत्र राहू शकतात. मातृसत्ताक पद्धतीची छाप वनवासी जीवनावर अद्यापही पक्की आहे. आखाडा, भाया बसविणे, कंदोरी करणे, बाघबारस, काज करणे, पडकाई, कणसरी कथा हे वनवासींचे महत्त्वाचे सण, उत्सव, प्रथा आहेत. रांगोळी, चौक

नाशिक : वनवासी लोकसाहित्य

५५