पान:विश्व वनवासींचे.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि त्यांच्यातील औषधी गुणधर्मही त्यांनाच माहिती आहेत. त्याचे संकलन व शास्त्रशुद्ध प्रयोगशाळेतून सिद्धता करणे, निष्कर्ष काढणे सर्वांनाच हिताचे आहे. अन्यथा 'पेटेंट'च्या या जमान्यात आपण फार मोठा वारसा आणि हा ज्ञानाचा ठेवा गमावून बसण्याची भीती आहे. आपल्या भारत देशात नानात्वा बरोबरच एकत्व सामावलेले आहे.

विविधतेतून सुसंवाद

 आपल्या देशातील ही विविधता कोणत्याही प्रकारची विषमता निर्माण करण्यात असमर्थ ठरली. उलट, त्यातूनच सुसंवादाची निर्मिती झाली. सर्व राज्यातून याच भारतीय संस्कृतीच्या अंत:प्रवाहाची जाणीव होते. कालभान आणि परिस्थितीनुसार त्यात काही वेगळेपण, बदल जाणवत असले, तर मुख्य स्रोत एकसंध व मूलतत्त्वे अबाधित राहिली आहेत. हा संस्कृतीचा ओघ अखंडपणे प्रवाही आहे. प्रत्येक राज्याला, जिल्ह्याला एक अदृश्य चेहरा असतो त्याची ओळख आपल्याला मुद्दाम करून घ्यावी लागते. आपल्या महाराष्ट्रात देखील वनवासी पट्टा फार मोठा आहे. त्यांच्या परंपरा आणि अनोखे अद्भुत जतन केलेले आजवरचे 'शहाणपण' आपण आवर्जून जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

वनवासींचे 'काज'

 वनवासी वर्षातून एकदा काज घालतात म्हणजे सामुदायिक श्राद्ध. आपण असे सामुदायिक विवाह, व्रतबंध पाहतो पण ही 'काज' प्रथा अत्यंत लक्षणीय आणि अनुकरणीय आहे. 'काजा'मध्ये वर्षभरात मृत झालेल्या व्यक्तींचे एकत्रित सांत्वन कार्य-पार पाडले जाते. भले मातीचे पिंड ते करतात पण सगळ्यांचे एकत्र श्राद्ध घातले जाते. आणि तेथेच पुन्हा कुटुम्ब पुनर्वसनाचा प्रयत्न होतो. विधवा स्त्री आणि विधुर पुरुष यांच्या अनुरूप जोड्या जमविल्या जातात. शेतीकामासाठी कुटुम्ब उभारणी गरजेची ठरते. त्यावर त्यांनी हा काढलेला तोडगा आहे.

 तसेच लग्न करण्याची ऐपत नसेल तर स्वखुषीने एकत्र राहतात. पती पत्नी एकनिष्ठा जपतात. मुले होतात. काळ अनुकूल झाल्यावर विवाह करतात ही तडजोडही गरिबीतून घडत राहते. फार तर घरजावई होऊन गरीब मुलगा सासऱ्याची शेती ठराविक वर्षे करतो

वनवासींची पर्यावरण जाण

५१