पान:विश्व वनवासींचे.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकसंस्कृतीचा अभ्यास व्हावा

 वनवासी कला, साहित्य आणि संस्कृतीची जोपासना व्हावी आणि त्यांच्या नितळ जीवन शैलीचा सर्वांगीण विकास घडून यावा हा सद्भाव आपण सगळ्यांनी मनोमनी बाळगला पाहिजे.

 हे खरे आहे, की अंधश्रद्धेचा प्रभाव आणि विज्ञाननिष्ठेचा अभाव वनवासींमध्ये आहे. तथापि, त्यांच्या त्या अंधश्रद्धाही कारणमीमांसेसह आपण नीट समजून उमजून घेतल्या पाहिजे.

 वनवासी धार्मिक कामकाजात आणि परंपरागत नृत्यगानात मग्न होऊन विविध सणवार, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात. होळी धुलीवंदनाचा सण, दिवाळी, आखाती (अक्षयतृतीया), दसरा, पोळा, नागपंचमी, कवळीभाजी, बीजा या सणांचे वनवासींच्या जीवनात वेगळेपण आहे. त्यात पर्यावरण संवर्धनाची व निसर्गाशी एकरूपतेची जाणीव आहे. बोहाड्यासारखे उत्सवही त्याला पूरक आहेत. वनवासींची जंगलगीतं संख्येने विपुल आणि 'जंगलची छाया' जपणारी आहेत. त्यांच्या काही गीतांची शीर्षके पाहा- 'हळदीनं भरलंय पातळ बायचं', 'काजळ्या डोहो माजविला', 'दर्याच्या किनाऱ्याला उगवेला चंद्र', 'शेवंतीची फुले' या त्यांच्या लोकगीत सदृश गीतामधून निसर्गाची ओढ आणि जिव्हाळा प्रगट होतो. त्यातील काव्य आणि कल्पनाविलास लक्षवेधी आहे. वनवासींच्या लग्न, काज, नव्या धान्य पिकाचे वाजतगाजत पूजन करून ते देवाला वाहणे, लक्ष्मीला सोनकमळ वाहणे या प्रथाही निसर्गप्रेमाची साक्ष आहेत. वनवासींच्या या जीवनसरणीकडे आता प्रगत पौर्वात्यांचे आणि पाश्चिमात्यांचेही लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणी, त्यांचे वाक्प्रचार यातही, पर्यावरणशास्त्र Ecology/Environmental science भरलेले आहे असा प्रत्यय या अभ्यासकांना येत आहे. पॅरीसच्या अभ्यासकाचे उदाहरण या संदर्भात लक्षात घेण्याजोगे आहे. मुद्दाम मराठी भाषा मोडकी तोडकी शिकून त्याने वनवासी पाड्यांवर जाऊन त्यांच्या म्हणी व वाक्प्रचार संग्रहीत केले. तेवढ्यासाठी तो पॅरीसहून जव्हारला आला होता. झाडपाल्याची वस्त्रेही अतिग्रामीण भागात वनवासी वापरीत तसा वनौषधींचा उपचार हाच त्यांचा निसर्गोपचार होता. वनवासीइतकी वनस्पतींच्या जातकुळींची ओळख कोणाला नाही

५०
विश्व वनवासींचे