पान:विश्व वनवासींचे.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासींची पर्यावरण जाण

 समाजात आज स्वातंत्र्य, समता, समरसता आणि बंधुत्वाची भावना निर्माण होणे ही आजच्या काळाची गरज आहे. Libralisation, Privatisation आणि Globalisation, (LPG) च्या आजच्या काळात सर्वसामान्य माणसाला खंबीरपणाने उभे राहावयाचे आहे. त्यासाठी आपण वनवासी बांधवांना अज्ञ, अडाणी, दुर्बल, दरिद्री, अशिक्षित समजून मार्गदर्शन करण्याची जशी गरज आहे त्याचप्रमाणे त्यांनी आजवर जपलेल्या परंपरा, रीती रिवाज, त्यांचे आडाखे हेही समजावून घेण्याची गरज आहे. विचार संस्कृती परंपरांचे वस्तुत: आदानप्रदान करावयाचे असते.

'रिव्हर्स' गिअरही आवश्यक

 आपल्याला असे वाटेल, की आपण मागे जातो आहोत, पूर्वीचे जुने तेच चांगले असे मानीत आहोत. या वनवासींपासून आपण काही शिकावे असे आहे का? पण लोकसंस्कृतीच्या अभ्यासकाला असे म्हणून चालत नाही? जे जे उन्नत, उदात्त ते ते आपण स्वीकारले पाहिजे. चांगल्याचा स्वीकार केला पाहिजे. हे मागे येणे नसते. गाडीला अन्य चार गिअर्सबरोबर पाचवा रिव्हर्स गिअरही असतो, तो आपल्या सुरक्षिततेसाठी हिताचा संरक्षक म्हणून असतो अन्यथा आपण भयंकर अडचणीत येऊ शकतो. त्याच दृष्टीने आपले चांगल्यासाठीच हे मागे वळून पाहाणे आहे. पर्यावरणाच्या संदर्भात आज आपण सावध झालो आहोत, जागरूक होत आहोत. कारण Global warming ची भीती निर्माण झाली आहे. हे सगळेच प्रश्न गंभीर बनत आहेत. अशावेळी पारंपरिक आणि अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींची सांगड घालावी लागते. वनवासी बांधव वैदिक काळातील हिंदू संस्कृती जपणारे आहेत. वेदात जशी उषासूक्त, वरूणसूक्त, मंडूकसूक्त आहेत त्याचप्रमाणे वनवासी देखील निसर्ग पूजक आहेत. देव, पशू, पक्षी, प्राणी, वृक्ष, धरतीचे पुजारी आहेत.

४९