पान:विश्व वनवासींचे.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अशी ही जन्मजात परंपरेनं जोपासलेली वारली चित्रशैली त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनली आहे. श्रद्धा,भक्ती, मनोरंजन, श्रमपरिहार यांची जोड असलेली वारली 'चित्रशैली' ही एक मूलभूत कला ठरते. ती सुखद अनुभूती देते. लग्न चौक, देव चौक, देवता पूजन, पंच, ग्रामदेवतापूजन या सगळ्यांनाच वारली संस्कृतीजनित चित्रकलेत मोठा सूचक अर्थ आहे. वारल्यांच्या जीवन जगतातील अदम्य उत्साह त्यात आहे. त्यांच्या संवेदनशील सकारात्मक मनाची ती उत्तम अभिव्यक्ती आहे. तारपा नृत्य, लग्नाची वरात, शेती संस्कृती याचे मुक्त चौकात, त्रिकोण, वर्तुळ, रेषा यांनी साधलेली ही चित्रकला. त्यात सूर्य, चंद्र, माणसं, प्राणी, झाडं, पक्षी, वृक्ष, टेकड्या, जंगल, पर्वत, नद्या, मंदिरं इत्यादी आहेत. त्यातून वारली जीवनाशी संवाद साधता येतो. वनवासी भोगत असलेला प्रतिकूल परिस्थितीवरील हा उतारा, तोडगा आहे. प्रांजल चित्रण आहे. धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली ही कला समजून घ्यावी लागते. सापांचे आकार, कोळीष्टक, धरणी माता सांभाळणारा सूर्य, सुगीचे दिवस, हिरवा देव, नारन देव, मानव आणि निसर्ग हे सारे वारली चित्रकलेचं दीपवून टाकणारं वैभव आहे.











अशी ही जन्मजात परंपरेने जोपासलेली वारली चित्रकला म्हणजे वारली लोकसंस्कृतीचा, लोक जीवनाचा एक अनोखा आविष्कार आहे.

***
४८
विश्व वनवासींचे