पान:विश्व वनवासींचे.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वारली चित्रकला

 'वारली चित्रशैली' ही वारली लोकसंस्कृतीची एक जगप्रसिद्ध श्रेष्ठ अभिव्यक्ती आहे. मौलिक कमाई आहे. जणू वारली समाजाला लाभलेले ते एक खास वरदान आहे. वारली चित्रकलेच्यामध्ये अग्रभागी डहाणूच्या ‘जीवा सोमा म्हसे' याचे नाव आज आहे. त्याचप्रमाणे आता कृष्णा जेठ्या, पसारी, बाळ लाडक्या दुमडा, नथुदेऊ सुतार, राजेश वेत्या वनगड, मंकी बापू वोडा इत्यादी वारली चित्रकारही प्रसिद्ध झाले आहेत.

 वारली चित्रशैली, वारली जीवनाचा एक परम श्रेष्ठ धर्म आहे. त्यातील सूक्ष्म गोष्टींतूनही त्याचा प्रत्यय येतो. वारल्यांची तंबाखू खाण्याची / ठेवण्याची पिशवी, डबा, स्त्रीयांच्या केसांची ‘फणी' यातही त्याची कलाकुसर दृष्टीस पडते. त्यांच्या सर्वच कलांच्या बाबतीत आणि विशेषतः चित्रकलेच्या बाबतीत निसर्ग हाच खरा गुरू आहे. गाईच्या शेणाने सुबकपणे सारवलेला गोठा, त्यांच्या भिंतीवरसुद्धा ही चित्रकला शोभायमान दिसते. तांदळाच्या पीठाने, फार तर तांबूस रंगाच्या गेरूने ही चित्रकला सजलेली आहे. त्यांच्या धार्मिक कार्यक्रमात विवाहप्रसंगी खास करून ही चित्रे रंगविलेली असतात. एका अर्थाने त्यांच्या देवदेवतांचे ते वारली समाजाने केलेले आराधन आहे. त्यात माणसं, पशू-पक्षी, रंगरेषा यांचे ते अप्रतिम प्रतीकात्मक आरेखन असते.

 सुप्रसिद्ध चित्रकार रवीजी परांजपे यांनी या वारली चित्रकलेला 'आदिम अभिजात कला' म्हणून संबोधले आहे. त्यांच्या 'आदिवासी कला : छे छे ! आदिम अभिजात कला' या लेखात त्यांनी म्हटले आहे की, 'ही आदिमकला जर घडली नसती तर आजची सुबोध, सुंदर भावपूर्ण चित्रकला शक्य झाली नसती हे सांगायला हवे.' पुढे त्यांनी असे लिहिले आहे की, “१९६४ साली या वारली चित्रकलेचा परिचय भास्कर कुळकर्णी या चित्रकाराने घेतलेल्या शोधामुळे घडला. परंतु १९६४ नंतरच्या मराठी चित्रकारांनी वारली चित्रकला पुढे नेण्याचे प्रयत्न यशस्वी केले नाहीत. त्यामुळे वारली चित्र परंपरा गोठलेली राहिली. आजच्या मराठी जनमानसात कलाविषयक जागृती पुरेशी नसल्यामुळेच वारली चित्रकलेचं भ्रष्ट अनुकरण शिकविणारे वर्ग गल्लोगल्ली वाढले आहेत.” (आम्ही आदिवासी विशेषांक, पान क्र.९)

वारली लोक संस्कृतीचे विशेष

४७