पान:विश्व वनवासींचे.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'बोलवे' म्हणतात. असे विवाह अनैतिक नसून समाजमान्य आहेत. वारलींच्या विवाहात त्यांचे कुलदैवत 'हिरवादेव' याला फार महत्त्व आहे. त्याखेरीज विवाहनिर्विघ्न पार पडत नाही. हळद लावणे, बाशिंग मोडणे म्हणजे लग्नाला जमलेल्या विवाहित मंडळींच्या कपाळाला आधी बाशिंग धरून, अक्षता वाहून मग नवरा-नवरीला बाशिंग बांधतात. मग 'लोण लखण' म्हणजे एक तांबड्या रंगाच्या चिंधीत हळकुंड, तांदूळ, सुपारी, उडीद, खारीक अशा ७ पदार्थांना एकत्र करून वधुवरांच्या गळ्यात बांधतात.

 ओटी भरणे, घाना गाठी म्हणजे काळीगाठी नवरानवरीच्या गळ्यात घालतो हेच मंगळसूत्र. विवाहानंतर स्वत: फेरे, उंबर लावतात, सुडकी म्हणजे साड्या वाटतात. आहेर पद्धतीही यथाशक्ती या वारलींमध्ये आहे. एरव्ही आठवडाभर चालणारा विधी बदलत्या काळानुसार अनुकरण करून नव्या पद्धतीने एका दिवसातही विवाह उरकतात. वारली चित्रकलेलाही विवाहात महत्त्व आहे. भिंती सारवूनच त्याला सुरुवात होते. विवाहात पहिला बोल हा 'लहान बोल' असतो. त्याला फारसे महत्त्व नसते. दुसऱ्या म्हणजे मोठ्या बोलानंतरच (वानिश्चय) लग्न होते. 'देज' म्हणजे आजच्या भाषेत हुंडा, वारलींचा देज; दोन मण भात एक पायली तुरी आणि १२॥ रुपये मुलीच्या आईवडिलांना । वरातीचा खर्च म्हणून दिला जातो. भाऊबंद आणि ग्रामस्थ यांचाही काही रक्कम देऊन मानसन्मान केला जातो.

 हळद लावलेला तांदूळ सगे सोयरे आप्तेष्टांच्या दारी ठेवून निमंत्रण करतात. याला 'नोत्र' असे म्हणतात. लग्नाच्या कार्यासाठी माणसे निश्चित करणे याला 'विडा बांधणे' म्हणतात. “बस्ता' बांधताना दोन्ही वधुवर पक्षातील लोक एकत्र येतात आणि लग्नाचे सामान घेतात. लग्न मंडपावर भातारी वा ‘पावली' किंवा 'कासर' ठेवून आंबा व कडू लिंबाच्या तोरणांनी पानांनी मांडव सजवतात. पूर्व दिशेला मंडपाचे द्वार ठेवतात. त्या दारानेच नवरदेव येतो. लग्नात 'धववेरी' स्त्री गाणी म्हणते. हीच गाणी धवळे म्हणजे मंगलाष्टक होत. असा हा वारलींचा विवाह साजरा होतो. आजही या परंपरा चालू आहेत.

४६
विश्व वनवासींचे