पान:विश्व वनवासींचे.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्याचा हा मंत्र आहे. पण त्यातही रामायण आहे. 'राम लक्ष्मण वनात गेले, तेनी कहाडली काळी सरमा, सरमा खेवळता लागाल घाय, भरत सीता वनसापद घाय आहे, समून जाऊ दे, जमून जाऊ दे, नाय तर माज्या गुरुची आई न रे'

 वस्तुत: अत्यंत खडतर जीवन वारल्यांच्या वाट्याला आलेले आहे. परंतु वन-निसर्गाचे वरदान त्यांना लाभलेले आहे. त्याचे प्रतीक म्हणजे वारली स्त्रिया! मिळेल त्या रानफुलांना माळतात तेही मोठ्या आवडीने. असेच त्यांचे सणवार उत्सव. आहे त्या परिस्थितीवर मात करून, आनंदात साजरे होतात. सुगीच्या दिवसात तारपा नृत्याला रात्र जागविणारा बहार येतो. अत्यंत लयबद्ध, धुंद, बेहोष करणारे हे नृत्य आहे. जसजसी रात्र चढत जाते तसतशी तारपा नृत्याची रंगत संगत वाढत जाते. वयाचे, स्त्री पुरुष असल्याचे भान विसरून नृत्य तारपा आणि चुंगरूच्या काठीच्या ठेक्यावर चालते.

वारली विवाहपद्धती

 समाजाचा विकास पाहायचा तर त्या समाजाची विवाह आणि कुटुम्ब पद्धती लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. त्या त्या विशिष्ट समाजाचे खास नियम असतात. बंधने असतात. हा समाज अनिबंध, मुक्त स्वातंत्र्य देताना उत्सुक नसतो. सांस्कृतिक मूल्ये व्यक्तिवर्तनाला मर्यादा घालतात. वारली समाजातही हेच दिसून येते. वारली विवाह पद्धतीत विचार विनिमयातूनच बहुसंख्य विवाह ठरतात. काही वेळा मुलगा नाही म्हणून किंवा वरमुलाची गरिबी आहे म्हणून घरजावई ठेवून घेण्याची एक पद्धत रुढ आहे. तो मुलगा दहेज देता येत नाही म्हणून सासऱ्याच्या शेतात प्रामाणिक कष्ट करतो. त्याला घरोंदा, घरोरी, खंदाड्या शब्द रूढ आहेत. हे गरीब वरांबद्दल; पण काही बाबतीत मुलीच्या बापाला ठराविक रक्कम देऊन, वर वधूला स्वगृही आणतो. तिच्याशी संसार करतो. त्याला कोरड्यावरचे लग्न म्हणतात. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यावर विवाह न करता एकत्र राहून वारली एकत्र वैवाहिक जीवन जगू शकतात. त्यांना मुले ही होतात. नंतर सोयीसवडीने ते विवाहबद्ध होतात. साखरपुड्याला वारली 'पेण',

वारली लोक संस्कृतीचे विशेष

४५