पान:विश्व वनवासींचे.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिशीलन, मूल्यांकन आणि महत्त्वमापनही झाले पाहिजे. त्याचे मोल लक्षात आले, तर संवर्धन आपोआप होईल.

वारली जीवनशैली

 वारल्यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकणारे एक लोकगीत मोठे बोलके आहे. त्यात नमूद आहे.

'बामणाच्या जल्माला जाशी
त लिखू लिखू मरशी ।
मारवाडी होशी
त तोलून तोलून मरशी ।
चमार होशी
त नाड्या जाती करून मरशी ।
पण वारल्याच्या जल्माला जाशी
त 'जंगलचा राजा' होशी ।'

 असे हे जंगलचे राजेपण वारली समाजाच्या लोकसाहित्यात आलेले आहे. अशा गीतामधून वारल्यांची अस्मिता आणि स्वाभिमान नजरेत भरतो आणि ती वस्तुस्थिती आहे. वारली अगदी लग्नाला पैसा नसेल तर 'घरोंदा' घरजावई म्हणून भले सासऱ्याकडे ठराविक काळ २/३ वर्षे राहील पण मुदत कालावधी संपताच बायकोला घेऊन त्याच दिवशी आपल्या घरी जाईल. मिंदे जिणे त्याला पसंत नाही. करार संपला, की झाले.

 दुसरे कदाचित मातृभूमीबद्दलची भावना जाणीवपूर्वक तेथे नसली तरी धरतीबद्दल त्याच्या मनात श्रद्धा आहे. धरित्री आपली देवता आहे. तिला येता जाता नाचताना आपले पाय लागतात म्हणून या काळ्या आईबद्दलची कृतज्ञता एका अशाच वारली लोकगीतातून समर्थपणे अभिव्यक्त झालेली दिसून येते.

'अथ नाचू का, कोठ कोठ नाचू
धरतीच्या पाठीवर,
धरतरी माझी मायूर
तिला मी पाय कसा लावू रं,
वारली लोक संस्कृतीचे विशेष

४३