पान:विश्व वनवासींचे.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वारली लोकसंस्कृतीचे विशेष

वनवासी मुलुख

 महाराष्ट्राच्या आदिवासी प्रदेशाचा विचार केला तर नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, ठाणे, पालघर, वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, खोडाळा, नाशिक, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, सटाणा, बागलाण, कळवण, मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, किनवट इत्यादी वनवासी समाजाच्या वास्तव्याची स्थाने आहेत. वारली समाज हा तुलनेने महादेव कोळी आणि कोकणा यांच्या मानाने अधिक मागासलेला आहे. वनवासी जमातीमध्ये महादेव कोळी, कोकणा, क ठाकूर, म ठाकूर, मल्हार कोळी, ढोर कोळी, कातकरी, भिल्ल, गोंड, तडवी, वळवी, गावीत, आंध, पावरा, धानका, कोरकू कोलाम आणि वारली अशा अनेक जमाती आहेत. भारतात या जमातींची संख्या ४२७ इतकी नोंदविली आहे.

वारली समाज

 प्रामुख्याने डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा या भागातील पाड्यावर सर्वत्र विखुरलेला हा वारली समाज आहे. मुख्यत्वे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वास्तव्य वारली या जमातीचे आहे. १० लाखाहून अधिक या वारली जमातींची लोकसंख्या आहे. महाराष्ट्राप्रमाणेच, गुजराथ, कर्नाटक, सिलवासा, दादरानगर हवेली भागातही ठाणेनाशिक जिल्ह्याप्रमाणेच वारल्यांची वस्ती आहे. या वारली लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी त्यांच्या जमातीचा एक आलेख मांडला पाहिजे. सकाळपासून तो झोपेपर्यंतची त्यांची दिनचर्या तपासली पाहिजे. वारली समाजाच्या चालीरिती, परंपरा, सणवार, उत्सव, लोकसमज, अपसमज, प्रथा, रूढी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी, त्यांच्या लोकसाहित्याचा सर्वांगीण अभ्यास आणि संशोधन करावे लागेल. लोकगीते, लोककथा, म्हणी आणि वाक्प्रचार, प्रहेलिका आणि कोडी उखाणे नुसते संकलन, जतन करून भागणार नाही, तर त्याचे नव्या काळाच्या संदर्भात

४२
विश्व वनवासींचे