पान:विश्व वनवासींचे.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. त्यात शक्यतो स्त्रिया या कमी प्रमाणात असतातच. पुरुषांचाच नाच निदान मी कानोसा घेतलेल्या भागात तरी आहे. या 'मांदळा'त नकला केल्या जातात; काही कसरतीही सादर केल्या जातात.

 त्यांच्या त्या ढोलाच्या आवाजात आपल्याला गाणे-लोकगीते हरवलेली भासतात. मांदळ नाच, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका परिसरात खूप लोकप्रिय आहे. 'मांदोळ वाजे धोबींग कींग धींग असे म्हणत मांदळ नृत्य सादर होते. या नृत्यासह विविध प्रकारचे संवाद, सोंग सादर करतात. म्हणाल तर एक प्रकारचे 'नाटक'ही तेथे सादर होते. 'मांदोळ' नृत्य करणारी काही गावे-पाडे सुरगाणा भागात सर्वश्रुत आहेत. रगत विहिर, महालपाडा, हडकाईचुंड, केळीपाडा, पांगारणे, उद्माळ या पाड्यांवर सर्रास मांदळ नाच चालतो. या मांदळ नाचात संवाद, नाटक सोंग आणि कसरती नकला यांचा अवलंब केला जातो. भाद्रपद, अश्विन, कार्तिक या महिन्यात या प्रकारच्या नृत्याला उधाण येते. डांग/गुजराथ सीमारेषाही आहे. या भागात वनवासींनी ही नृत्यकलाविष्कार संस्कृती आजपावेतो जतन केलेली आहे. या नृत्यात गोलाकार, अर्धगोलाकार भ्रमराच्या रुंजी घालण्याप्रमाणे अथवा सर्पाकृती फेर धरून लोक नाचतात. 'कावळ्याचे' सोंग घेतात. हिंदू कोकणा, हिंदू महादेव कोळी, हिंदू वारली या जनजाती 'बोरी' पाड्याला बोरी पिकल्या दोन' सारखी गीतं 'मांदळ' मध्ये म्हणतात. या नाचात स्त्रियांचाही सहभाग असतो. ढोलाला दोन्ही बाजूने मेणाचे गोळे लावलेले असतात. त्यामुळे त्या ढोलाचा घुमणारा आवाज वेगळाच ध्वनित होतो. मांदळासाठी संबंधितांना आवतन म्हणजे निमंत्रण दिले जाते आणि मग रात्रभर 'मांदोळ' नाच चालतो.

 अशा या जनजातींच्या नृत्य संस्कृतीचे भारतीय नृत्याच्या संदर्भात बहुमोल, फार मोठे योगदान आहे. वनवासी नृत्यकलेचे दालन मूळातच खूप समृद्ध आहे. या जनजातींच्या लोकगीतांचे फार मोठे वरदान लाभलेले आहे. या प्रत्येक नृत्य प्रकारात लोकगीतांची रेलचेल असते. मौखिक परंपरेने चालत आलेली ही लोकगीते नृत्य सादर

४०
विश्व वनवासींचे