पान:विश्व वनवासींचे.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जनजातींच्या गावीही नसते.

बोहाडा

 बोहाडा, 'भवाडा' हा त्यांचा एक उत्सवच असतो. याला देवाचा उत्सव म्हणावे. वेताळ, बहिरोबा, खंडोबा, जगदंबा, गणपती, महादेव अशा देवांचे मुखवटे परिधान करून रात्रभर वाद्याच्या तालावर, गाण्याच्या सुस्वरात ते नाचत असतात. परंपरेने घराण्यात आलेले ते देवाचे सोंग असते. प्रत्येक देवाची पुन्हा नाचण्याची पद्धत स्वतंत्र, वेगवेगळी असते. मुखवटे तयार करण्याची कला या वनवासींनी आत्मसात केलेली आहे. आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून झाडांच्या पानांपासून रंग आणि मुखवट्याचा लगदा, झाडाचाच डीग घालून तयार करण्याचे त्यांचे कसब आहे. आता हे मुखवटे ते उसनवारीने बोहाड्यासाठी शेजारच्या पाड्याला वापरायला देतात. एरव्ही वाद्ये, मुखवटे या सगळ्यांनाच त्यांच्या देव्हाऱ्यात स्थान असते. आणि वर्षभरात कधीतरी ते ठरलेल्या वेळी बाहेर काढतात. या बोहाडा उत्सवाला आता जत्रेचे स्वरूप आले त्यात आदिवासी युवक युवतींच्या सहभागही सहेतुक वाढला आहे.

मांदळ नाच

 या लेखातः मांदळाच्या संदर्भात विशेष तपशीलाने विचार करावयाचा आहे. मांदळ यालाच 'मांदोळ', 'मादळ', मांदळ' असे वनवासी बोलभाषेमध्ये म्हटले जाते. बोहाडा, ढोलनाच, टिपरी नाच, दंडार, डिंडण, गोसई, करमा, घांगळी, कोंबड या नृत्याच्या विविध प्रकारांप्रमाणेच हा एक वनवासींच्या नाचाचा प्रकार आहे.

 शिमगा, होळी याच दिवसात 'मांदोळ' या नृत्याला बहर येतो. यात एक भला मोठ्ठा ढोल असतो आणि या प्रचंड ढोलाच्या नादात तालावर फेर धरून लोक दंग होऊन नाचत असतात. लोक स्वत: होऊन त्यांना बक्षिसी, बिदागी देतात. पण भीक मागण्यासाठी ही वनवासींची नृत्ये नाहीत. ती आहेत स्वान्तसुखाय आणि फारतर लोकहिताय! 'मांदळ'मध्ये साधारणपणे १२ ते १५ लोक सहभागी

वनवासींचा मांदोळ नाच
३९