पान:विश्व वनवासींचे.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनवासींचा मांदोळ नाच

 भारतीय जनजातीचे कलात्मक आविष्कार विविध परीने झालेले आहेत. तांदळाच्या पीठाने वारली चित्रकला साकार करण्यापासून तो विविध प्रकारची लोकनृत्ये सादर करण्यापर्यंत आपल्याला हरखून टाकणारे त्यांचे लोकाविष्कार आहेत.

 भारतीय जनजाती या आविष्कारात आपली तहान-भूक विसरतात. पिळवणूक विसरतात, गरिबी विसरतात, अडाणीपण विसरतात, दिवसभराचे उपसलेले कष्टही विसरतात. असे हे जालीम कलाविष्कार त्यांचे आहेत.

वनवासींची नृत्यकला

 जनजाती म्हटले, की नृत्य आणि तेही सामूहिक हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहे. परंपरेने चालत आलेली ही लोकनृत्ये आहेत. मागच्या पिढीचे पुढची पिढी रास्त अनुकरण करते आणि ही लोकनृत्याची परंपरा अबाधित राहते. नृत्ये सादर होण्यास फार काही घडावे लागत नाही. कोणत्याही प्रसंगाच्या निमित्ताने लोक एकत्र जमतात आणि मनोरंजनासाठी बेभान होऊन नाचतात. मात्र कृषिसंस्कृतीतल्या सुगीच्या दिवसात, विवाह समारंभात, होळी-दिवाळीच्या सणाच्या दिवसात या लोकनृत्याच्या आविष्काराला बहर येतो.

 वनवासी नृत्यामध्ये तारपा, पावरीनाच, तूरनाच, गौरीनाच, कांबडनाच, घोरनाच, ढोलनाच, स्त्री-पुरुष एकत्र नाचून धुंद होतात. अर्थात काही नाचात फक्त पुरुषच असतात. विशेषतः कसरती, कवायती ज्या नाचात असतात त्यात पुरुषांनाच प्राधान्य मिळते. एरव्ही 'गौरीनाच' स्त्रियाच रंगतदारपणे सादर करातात. तारपा नृत्यात तर स्त्री-पुरुष परस्परांच्या कमरेला घट्ट विळखे घालूनच नाचतात. शुद्धमनाने आणि निर्मळ अंत:करणाने ही कला साधना त्यांची चालू असते. किंबहुना आपले हे काही कलाआविष्कार कलात्मक आहेत हे सुद्धा बिचाऱ्या

३८
विश्व वनवासींचे