पान:विश्व वनवासींचे.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तयारी होते. आदिमाता जगदंबा तिचा हा उत्सव, विविध मुखवटे घालून सोंगे नाचवून तो साजरा होतो. संबळ, तुतारी, सूरवाद्यांच्या तालात देवदेवता व इतर अशी मिळून ३०/४० सोंगे, स्वीकृत अवतारानुसार, वेगवेगळ्या पद्धतीने नाचून मिरवतात. सोंगानुसार नृत्याची चाल आणि वाद्यांची आतषबाजी असते. छोटेखानी स्वरूपात त्या गावात यात्राच या बोहाड्याच्या निमित्ताने भरते. गणपती, बहिरोबा, हिरवा देव, जगदंबा असे मुखवटे असतात. 'बोहाडा' लोकनृत्य माध्यमातून केलेली श्रद्धायुक्त करमणूक असते. त्यामुळे वनवासींना नवा हुरूप येतो. नवी उभारी आणि उमेद येते.

 'तारपा' हे वनवासींचे अत्यंत लोकप्रिय नृत्य आहे. 'काठ्या' त्याच्या काठीला डूंगरं असतात, यालाच 'म्होरक्या' किंवा 'मांदोळ्या' असेही म्हणतात. त्याच्या सूचक हालचाली, इशाऱ्याने तालबद्ध फेर धरून नाचतात. स्त्री-पुरुषांचे पदन्यास विलोभनीय असतात. तारपा वाजवणारा दमदार, ताकदवान गडी लागतो. तरुणींनाही तो आवडतो. बेहोषी आणि धुंदीचा आगळा अनुभव 'तारपा' नृत्यात येतो. म्हणून 'बर्हाड रसेल'सारखा तत्त्ववेत्ता म्हणतो की, 'तुमची ही बेहोषी माझ्या वाट्याला आली तर मी माझे सगळे तत्त्वज्ञान आणि ग्रंथ वनवासींना अर्पण करायला तयार आहे.'

 त्याचप्रमाणे 'पावरी' नृत्यात लांब वक्राकार भोपळा, बासऱ्या बैलाचे शिंग, मोरपिसे यांचे ‘पावरी' वाद्य तयार केले जाते. वनवासी पावरीला देवासमान मानतात. पावरीचा सुमधुर सूर, टाळ्यांचा नाद, खरारा, काठ्यांची धुंगरे आणि पावलांचा ताल या ध्वनिमेळात हा नृत्याविष्कार होतो. त्यात कृष्णावतार स्वरूप एकजण 'खुट्या' असतो. मावल्यांना सांभाळणे, दिशा दाखविणे हे त्याचे कार्य. मोरपिसाचा कुंचा हाती घेऊन तो नृत्यातील दिमाख सावरतो. चुका करू देत नाही.

'वरल्या माळीला उन्ह्या पावा वाजव वं, उन्ह्या पावा वाजव वं'
'रंग दिला व दिला शेंदवड गोळाला वं शेंदवड गोळाला'

पावरीच्या सुरात अशी ही गाणी गात लयबद्ध नृत्य सादर होते.

लोकनृत्य कलेचे जतन आणि संवर्धन

 यापुढील काळात आता वनवासी समाज हा आदिम, वनवासी,

विश्व वनवासींचे

३६