पान:विश्व वनवासींचे.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सादर होतात.

 वनवासींची ‘करमा', 'बिहू', 'परब' इत्यादी नृत्ये प्रसिद्ध आहेत. निसर्गाला संतुष्ट करण्याचा त्यांचा हेतू असतो. 'बोहाडा'सारखी नृत्ये धार्मिक भावनेने सादर करतात. देवकृपा होते, पीकपाणी चांगले येते, शिकार मिळते ही श्रद्धा त्याच्या मुळाशी आहे. वनवासींमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्याच संस्कारांशी संबंधित-संयोजित, नृत्ये आहेत. सण उत्सवात याचे प्रत्यंतर येते. होळी पौर्णिमेच्या सणाला वनवासी त्यांच्या परंपरागत नृत्यगान उत्सवात धार्मिकता म्हणून, असतील तेथून गावी, पाड्यावर येतात आणि नृत्यसोहळा साजरा करतात. दिवाळी, आखाती, दसरा, मकरसंक्रांत, पोळा, नागपंचमी आणि बीजा या सणात नृत्ये सादर होतात. राष्ट्रीय आश्विनच्या 'शुद्धातल्या पंचमी पासून वद्यातील चतुर्थी' हा कालावधी नृत्याला अनुकूल असतो. देवतांच्या आराधनेचे साधनही नृत्यच असते आणि आनंदाच्या प्रसंगात नृत्याला वाव असतो. नृत्याचा उगमच देवापासून त्यांनी मानला. 'नारनदेव', कनसरी देवीने कोंबडनाच, बडादेवाने 'राजनेरीबाना' परधानांना सांगितला. भिवसनदेवाचा ‘दंडार'. तात्पर्य - ईश्वराला ही लोकनृत्ये समर्पित असतात. ‘तारपा' वाद्यही देव्हाऱ्यात इतरवेळी ठेवतात. वनवासी नृत्याचे शौर्य वीरश्रीयुक्त नृत्ये, धार्मिक स्वरूपाची नृत्ये आणि सांस्कृतिक, ऋतुमानाप्रमाणे सादर होणारी नृत्ये असे तीन प्रकार मानलेले आहेत. विशिष्ट देवदेवता, झाड - वृक्ष, बळीचा पशू यांच्याभोवती हे धर्मनृत्य करतात. 'डिंडण', 'गावबांधणी', 'भिवसन पूजा' अशी ही नृत्ये सादर होतात. वनवासींच्या वेगवेगळ्या जमातींचे वेगळेपण लक्षात आणून देणारी ही नृत्ये असतात. 'भिल्ल' धरतीपूजा 'डिंडण' नाचात बांधतात. 'कोलम' दिवाळीत ‘दंडार' करतात. दंडरात पहिले नमन मारुतीला असते. तसेच 'टेमसा' हे जागरूक नृत्य आहे. 'कारसाड', 'मरकी' नाच मृतात्म्यासाठी असतो तर करमणूकीसाठी रेव्हॉ, सोंगाडी, गंमत, झगडा हे नृत्य प्रकार आहेत. टिपऱ्या, मांदोळ - ढोल, कांबड असे विविध नाचाचे प्रकार आहेत. झगा, फेर, गदा, तलवारी,लेहंगा, चाळ, डुंगरू अशी वेशभूषा परिधान करून नृत्य सादर होते. होळी-पौर्णिमा, धूलिवंदन झाले की 'बोहाडा' उत्सवाची

वनवासी लोकनृत्य

३५