पान:विश्व वनवासींचे.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अपत्य आहे. निसर्गाच्याच साथीने त्यांच्या लोकनृत्याच्या आविष्कराला ताजेपणा, नित्यनूतनता, नवता लाभली आहे. त्यांच्या कलानिर्मितीचे सारे रहस्य सृष्टी देवतेतच सापडते.

 मी या धरतीला, मायमातीला पाय कसा लावू? मग मी नाचू कुठे? धरणी माझी काळी आई आहे; हा वनवासीला पडलेला पहिला प्रश्न आहे.

'हत नाचू....का तथं....नाचू
कुठं मी नाचू.... कसा मी नाचू?'
धरतरी माझी माय हाय....'

 ज्या धरतीवर नृत्य साजरे व्हायचे त्याविषयीची ही या निसर्गपुत्रांची श्रद्धा, निसर्गाला त्यांच्या लोक जीवनात लाभलेल्या श्रेष्ठ स्थानाचे प्रतीक आहे. पावसाळ्यात होणारी अविरत बरसात, अखंड पाऊस, धारांचा वर्षाव, आकाशात मेघांचा गडगडाट, मेघगर्जना, श्रावणमासातील सोनेरी पिवळी उन्हे, पाऊसाची मधून भूरभूर, गार शिडकावे, हिरवीगार वनश्री, भरास आलेल्या पिकांचे डोलणे, वाहत्या वाऱ्यांचे ध्वनी, सृष्टीतील वादळवारा, गारांचा वर्षाव, विविध पशू, पक्षी, कीटक यांच्या विभिन्न हालचाली या विषयीची वनवासींची निरीक्षणे त्यांच्या लोकनृत्यात टिपली गेली आहेत.

 साप, नाग, शेलाटी, धामण यांचे फुत्कार, वळसे घेणे, सरपटणे, विळखे घेणे, त्यांचे आकार या नृत्यात साकार झाले आहेत. पशुपक्ष्यांच्या हालचाली, आवाज चित्कार याचे अलौकिक अनुकरण या लोकनृत्यात आहे. मोकळ्या मनाने हे निसर्गाने दिलेले धडे त्यांनी गिरविले आहेत.

लोकनृत्याला पूरक लोकगीते

 वनवासी लोकनृत्यात गायली जाणारी लोकगीते नृत्याला पोषक असतात. वाद्यांच्या गजरात मात्र गाणे हरवून जाते. या गाण्याचे शब्द कळत नाहीत. तसे गाणे पुनरूक्तीने भरलेले फारसे अर्थपूर्ण असतेच असे नाही. गीत स्वतंत्रपणे शब्दार्थासह आपल्याला समजून घ्यावे लागते. गीतातील शब्दयोजना गतिशील आणि नृत्यातील जोश-

वनवासी लोकनृत्य
३३