पान:विश्व वनवासींचे.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नृत्यातील 'समारोप' येथे नसतो. सगळ्यांच्या सहभागाने साजरे होणारे हे नृत्य त्यांच्यात जन्मापासूनच भिनलेले असते. ही नृत्यकला वनवासींचा अविभाज्य धर्मच बनली आहे. रंगात आलेल्या या लोकनृत्यात वनवासींचे 'हुर्रर्रऽऽ', हुर्योऽऽ' या आरोळ्या, चित्कार लोकनृत्याची लज्जत आणखी वाढवतात. सारा गाव जागा होतो.

'शिवू शिवू कुठं बाई, सारं आभाळ फाटलं
अन् तान्ह बाई माझं, ओल्या डोळ्यानं निजलं'

 अतिग्रामीण भागात, अर्धपोटी ठेवणाऱ्या दारिद्र्याच्या आगीत होरपळणाऱ्या वनवासींना ही लोकनृत्ये आधार बनतात. जीवनाला उभारी, मोठा दिलासा देतात. कष्टकऱ्यांचा कष्टाचा भार हलका होतो. नृत्यांची धुंदी तारून नेते, सावरते.

वनवासी लोकनृत्याला निसर्गाचे वरदान

 वनवासी लोकगीत आणि लोकनृत्याला निसर्गाचा लय, ताल, सूर, नाद, स्वर, सादरीकरण या सगळ्याच बाबतीत 'वरदहस्त' आहे. याच निसर्गाच्या सान्निध्यातून आणि अनुकरणातून त्यांना लोकनृत्य - गीतांचा बाज गवसलेला आहे. निसर्गाचे वरदान म्हणूनच त्यांचे लोकसंगीतही अवतरलेले आहे.

 वनवासींचा 'निसर्ग' हाच गुरू असून ते त्याचे पुजारी आहेत. निसर्गरम्य आनंदाचा ठेवा म्हणजे वनवासी लोकनृत्य होय. अभ्यास आणि संशोधन याची खात्री पटविते. लोकपरंपरेने, लोकधाटीतील, लोकसृष्टीतील हे आविष्कार परस्परपूरक आणि संबद्ध आहेत. वनवासींना निसर्गातून जे काही उपलब्ध होते त्याचाच वापर ते आपल्या साजशृंगारात करतात. जंगलातली फुले, बिया, रंगीबेरंगी दगड, कातडी, मणी, गुंजा, झाडांच्या साली, वाळलेली पाने, मुळ्या यांच्यापासूनच त्यांचे दागदागिने बनतात.

 वनवासी-संस्कृतीच्या जडणघडणीत निसर्गाचा मोठा वाटा आहे. निसर्गाने वनवासींची पारंपरिक जीवनपद्धती आपल्या संगीताने राखली आहे. वनवासी आणि निसर्ग असे अन्योन्याश्रयी आहेत; लोकनृत्ये याची साक्ष, ग्वाही देतात. वनवासी माणूस निसर्गाचेच जणू

विश्व वनवासींचे
३२