पान:विश्व वनवासींचे.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कसा सांभाळावा, वाद्यांच्या साथीने धुंद नाचावे कसे, ढोल, संबळ इ. लोकवाद्यांचा डांगोरा कसा पिटावा, झोकात पावलं कशी टाकावीत, खांद्याला - पाठीला हाताच्या विळख्यांची घट्ट पकड कशी बांधावी, हुर्ये ऽऽऽ उद्गार चित्कार घोषणांचा जल्लोष कसा करावा, मनोरेकसरतीची-चमत्कृतीची नृत्याला जोड कशी द्यावी, वेषभूषा - रंगभूषेतील वैचित्र्य कसे राखावे, नाचात वाघ, सिंह, मोर यासारख्या पशू -पक्षांची सोंगे कशी वठवावीत, नृत्याच्या धुंदीने भावनेने, संकोच सोडून, फेर धरून, मुक्तपणे कसे नाचावे, हे सारे वनवासी लोकनृत्यातून शिकण्यासारखे म्हणूनच अनुकरणीय आहे.

वनवासी लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब

 'आम्ही जंगलचं राजं वनवासी' आधीपासून जंगलात राहणारे जंगलचे राजे, वन निवासी म्हणून वनवासी, डोंगर-गिरिदऱ्यात राहणारे म्हणून गिरिजन, वनउपजावर जगणारे खरे स्वावलंबी-स्वयंपूर्ण असे आहेत. साऱ्या सभ्यता पाळून कळपाने, टोळीने, एकोप्याने सामुदायिक जीवन ते जगत आलेले आहेत. याच वनवासी लोकसंस्कृतीची गडद छाया त्यांच्या लोकनृत्य कलेवर पडलेली आहे. वनवासींच्या सांस्कृतिक जीवनापासून कलेच्या कक्षा अलग होत नाहीत. त्यांच्या कलांचा रसस्वाद म्हणूनच त्यांच्या धर्मश्रद्धा, रूढी, परंपरा, लोकनृत्य, लोकगीते, लोककथा या लोकविद्यांच्या संदर्भातच घ्यावा लागतो.

वनवासी लोकनृत्याचा आविष्कार

 वनवासींमधील तीन पिढ्या आजोबा, मुलगा आणि नातू असे आबालवृद्ध स्त्री-पुरुष लोकनृत्याच्या या फेऱ्यात पूर्णत: गुंतलेले असतात. त्या नृत्याचा मनसोक्त आनंद ते मुक्तपणाने लुटतात. त्यांच्या फेर धरून नाचण्यातील अंगविक्षेप, पदन्यास, वेषभूषा - रंगभूषा सजावट सारेच प्रेक्षणीय असते. फेरातील परिचित-अपरिचित भाव विसरून, स्त्री-पुरुषांनी नाचतांना खांद्यावर किंवा कमरेत हात गुंफलेले असतात. नाचता नाचता ते घामाघूम होतात, बेभान होतात तरीही कमरेतील हातांचा विळखा- खांद्यावरची घट्ट पकड कधी सैल होत नाही. यावेळी मनात कोणतेही किल्मिष नसते. कोणताही दुर्भाव नसतो. पाश्चात्त्यांच्या

वनवासी लोकनृत्य
३१