पान:विश्व वनवासींचे.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासी लोकनृत्य

 वनवासी लोकनृत्य (Tribal Folklore) यात 'लोक' शब्द जोडलेला असल्याने समूहनृत्य विचार येथे अभिप्रेत आहे. लोकविद्या, लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचे एक अंग म्हणूनच या लोकनृत्य कलेचा विचार येथे प्रस्तुत आहे.

 वनवासींचे जीवनमान आणि राहणीमान लक्षात घेता, सामूहिक भावनेला कटाक्षाने जपणारा हा समाज आणि त्याची संस्कृती आहे.

लोकनृत्याचा मनसोक्त आविष्कार

 वनवासी लोकजीवनामध्ये लोकनृत्यकलेला फार मोठे श्रद्धेचे स्थान आहे. लोकनृत्य हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य, अपरिहार्य घटक आहे. नाचगाणे ही त्यांची जीवनशैली बनली आहे. त्यामुळे लोकनृत्याचा मन:पूत, मुक्त आविष्कार त्यांच्या जीवनात अनुभवायला मिळतो.

 कृषिसंस्कृतीमधील शेतमजुराचे, ग्रामीण व्यवसायांमधील मासेमारीचे किंवा शहरी रोजगार हमीचे, धरणाच्या, वीटभट्टीच्या कामावरचे, काबाड कष्टाचे जिणे शिवाय कमालीचे दारिद्र्य आदिवासींच्या वाट्याला आले आहे.

{

'काम काम बघू काम कुठंच भरेना
बाई पोटातील आग, आग कुठं इझना'
शेवटी - 'ओल्या डोळ्यांनीच पोरं निजवावी लागतात.'

 असा हा वनवासी माणूस दारिद्र्यातच जन्मतो, वाढतो आणि शेवटी दारिद्र्यातच मरतो. तरीही वनवासी माणसांनी गीत-नृत्यसंगीतातील चैतन्य टिकवून ठेवले आहे. दु:ख विसरायला लावणारी, जीवनातला आनंद देणारी, बेहोषी, एक विरंगुळा, श्रमपरिहार करणारी ही लोकनृत्यकला त्यांनी जोपासली, आजतागायत जपली आहे. निसर्गाशी सुसंवाद साधणारे, आगळे स्वरूप हे या कलेचे वैशिष्ट्य आहे. नृत्यकलेतील वैभव ही वनवासी लोकनृत्यकला ठरू शकेल. ताल कसा धरावा, लय कशी पकडावी, नाद कसा साधावा, ठेका

३०
विश्व वनवासींचे