पान:विश्व वनवासींचे.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाते तेव्हा ती व्याकुळ होते. तिला आपले घर आणि नातीगोती आठवतात. त्यावेळी केलेला उपदेश -

'सासरच्या घरी गं बाई मी, बाबा कुणाला म्हणू ।
म्हण गं म्हण गं लेकी, तुझ्याच गं सासऱ्याला ।।
सासरच्या घरी गं बाई मी, आई कुणाला म्हणू ।
म्हण गं म्हण गं लेकी, तुझ्याच गं सासूला ।।'

हीच नाती पुराणातही गुंफली आहेत.

'सीता गेली वारूळे तळेला सोनु कंबळायला ।
हाक मारिते दशरथाला गं तिच्या सासऱ्याला ।
हाक मारते कौसल्याला गं तिच्या सासूला ।
हाक मारिते लक्ष्युमणाला गं तिच्या दिराला ।
हाक मारिते रामयाला गं तिच्या नवऱ्याला ।।

वनवासींच्या लोकसाहित्यातील ही पारंपारिक लोकगीते विस्मृतीत जाऊ नये म्हणून ती छापील स्वरूपात उपलब्ध करून दिली पाहिजेत! या गीतात रामायणातील सीतामाई वारूळ नावाच्या पाड्यावरील एका तळ्यात कमळे आणायला गेली ही कल्पना असून सीता, सासरा दशरथ, सासू कौशल्या, दीर लक्ष्मण आणि पती राम यांना हाक देते. सोनू हे गाणारीच्या मैत्रिणीचे नाव आहे. वनवासी लोकगीतात अशी आपल्या आप्तांची आणि परिचितांची नावे गोवता येतात आणि पुनरावृत्तीने गीताची लांबण ही लावता येते.

 उदा. कुंतीचे गाणे पहा -

‘सांगते देवाला रे कुंती सांगते कृष्णाला ।
रे कर्ण पांडव रे पहिला, रे कर्ण हा पांडव पाहिला रे ।
फुलं तोडण्यासाठी गेले जल देवीला
सूर्य मंत्राची आठवण मजला
सूर्य मंत्र जपीला रे देवा सूर्यमंत्र जपीला
रे कर्ण हा पांडव रे पहिला ।।'

 असे हे 'रामायण-महाभारतही' वनवासी लोकसाहित्यात मुरलेले आहे. अशी शेकडो लोकगीते उद्धृत करता येतील.

वनवासी लोकसाहित्याचे स्वरूप
२७