पान:विश्व वनवासींचे.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्ष तो मुलीकडे राहून शेतीकाम करतो. काहीवेळा तर विवाह न करता एकत्र राहून संसार करून अनुकूल परिस्थिती झाल्यावर विवाहसोहळा साजरा करतात.

वनवासींची मौखिक संपदा

 वनवासींचे लोकसाहित्य मौखिक परंपरेनेच चालत आलेले आहे. हे लोकसाहित्य लोकजीवनातूनच अवतरले आहे. लोकसाहित्याने लोकसंस्कृतीतील इष्टाचा पुरस्कार आणि अनिष्टाचा परिहार केलेला आहे. लोकभाषेतील लोकमनाचा हा अविष्कार आहे.

 वनवासी लोकगीतांतून सुंदर भावचित्रे रेखाटलेली आहेत. लग्नसोहळा प्रत्येक विधीप्रसंगात भावपूर्ण गीते आढळतात. वरमाईची गाणी, झालझेंड्याची गाणी, तेलवणाचे गीत लक्षणीय आहेत. कुटुंबातील नाती लोकगीतांतून उत्कटपणे दिवाळी, दसरा, होळी या सणांच्या निमित्ताने अभिव्यक्त होतात. उखाणे, म्हणी, कोडी, वाक्प्रचार असे विपुल अक्षरधन बोलीभाषेत गोवलेले लोकसाहित्यात आढळते. यातुविद्या, चित्रकला, लोककथा, नक्षीकाम अशा लोकविद्यांचा समावेश लोकसाहित्यात होतो. बोहाडा, काज, कवळीभाजी, मांदोळनाच, भोंडल्या, टिपऱ्यानाच, मर्तिकनाच, हस्तकला यांचाही समावेश वनवासी लोककला विचारात होतो.

 वनवासी लोकसाहित्यात म्हणी महत्त्वाच्या आहेत. 'फडकं घे, मडकं घे, सूट' या म्हणीत उपजिविकेसाठी केवळ एक मडके आणि फडके माणसाला पुरे होते. मर्यादित गरजांत जगण्याचा आदर्श या म्हणीतून सूचित होतो. आणखी काही म्हणी पुढीलप्रमाणे निर्देशिता येतील.

'कणगीत दाणा तं भील उताणा'
'निलाजऱ्याला मारला पिढा तं म्हणे बसाया दिला'
'लाज मरे तो भुके मरे' इ.

आता उखाणे पहा -

'जात कावळ्याची रगत माणसाचा' - करवंद
'एक दोरी टाकली तर बारा बैल बांधात' - काकडी
'दिवसभर गुरांच्या मागं हिंड रातचे खोपाला राहं' - काठी

 वनवासींची लोकगीतं बोलकी आहेत. माहेरवाशीण सासरी

विश्व वनवासींचे

२६