पान:विश्व वनवासींचे.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नृत्यानंतर त्याचे भाग सुटे करून बांबूच्या पेटीत ठेवले जातात. माडीयांच्या या प्रथेप्रमाणेच वनवासी कसरतींसह ढोलनाच करतात आणि त्याच्या तालात गीतगायन होते.

महाराष्ट्रातील मल्हार कोळी, ढोर कोळी, ठाकूर, कातकरी या वनवासींच्या पारंपारिक नृत्याला ढोलाची साथ लागतेच. गोकुळाष्टमी, वाघबारस, शिमगा या सणाला या नृत्याला बहर येतो. शंकर, पार्वती, विष्णू, भूमाता, चंद्र, सूर्य यांना वंदन करून नृत्याची अखेर होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकवाद्य म्हणजे वनवासींचे 'तारपा' हे होय. तारपा हे वाद्य सुक्या दुधी भोपळ्यापासून तयार केलेले असते. त्याला बांबू जोडून तारपा हे वाद्य बनविले जाते. भोपळ्याची लांबी मोठी असते. ताडाच्या पानापासून मेण लावून बासरीसारख्या नळ्या आणि कर्णा बसविलेला असतो. नारददेवाने तारपावाद्य दिले असा समज वारली मानतात. सुगीच्या दिवसात निघालेल्या पिकाचा आनंद लुटण्यासाठी वनवासी स्त्री पुरुष रिंगणात फेर धरून तारपाच्या तालावर मनसोक्त रात्र जागवितात. वनवासींच्या तारपानृत्यात पावलं टाकण्याच्या पद्धतीला महत्त्व आहे.

वनवासींनाही आपले देवधर्म आहेत. लोकदैवते आहेत. वेताळ झोटींग, माऊल्या, वाघोबा, हिरवा देव, म्हसोबा, कान्होबा, कणसरी, दुंदुर्भा, सारजा, नृसिंह, बहिरोबा, अहिरावण, गावदेवी या ग्रामदेवतांना त्यांनी आपल्या देव्हाऱ्यात स्थान दिलेले आहे. वनवासींना निसर्गाच्या सहवासाने सौंदर्यदृष्टी उपजतच लाभलेली आहे. त्यांच्या सौंदर्यविषयक जाणिवा निसर्गसापेक्ष आहेत. 'देवराईची' कल्पना निसर्गपूजक वनवासींनीच जपलेली आहे. वनवासींच्या बोहाड्यातही देव देवतांना मिरवताना विविध प्रकारची नृत्ये तल्लीन होऊन करतात.

वनवासींच्या लोकसाहित्यातून प्रतीत होणारा उदात्त दृष्टिकोण

वनवासींमध्ये मातृसत्ताक पद्धतीचा प्रभाव अद्यापही टिकून आहे. म्हणूनच वनवासींच्या विवाहात मुलीच्या पित्याला देहज (धान्य, दोन पोती भात, चांदी रूप्याचे दागिने) देण्याची प्रथा रूढ आहे. त्यासाठी मुलाला ही सगळी जुळवाजुळव आर्थिक तरतूद करून करावी लागते. काहीवेळा हे शक्य नसल्यास घरोंदा (घरजावई) म्हणून काही

वनवासी लोकसाहित्याचे स्वरूप
२५