पान:विश्व वनवासींचे.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देवतेच्या प्रार्थनेच्या वेळी मुख्यत: वारली लोक 'ढाक' हे लोकवाद्य वाजवतात. ढाक हा विशिष्ट प्रकारचा ढोलच आहे. मोठ्या डमरूच्या आकाराचा तो असतो. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात हे वाद्य विशेष करून पाहायला मिळते. कळंब झाडाचे पोकळ लाकडी खोड आणि बोकडाची कातडी यापासून हे वाद्य बनते. कातडीच्या दोन्ही कुंडांना ७/७ छिद्रे असतात. त्यातून ही कातडी घट्ट ओढून विधीपूर्वक वाद्य तयार केले जाते. हे वाद्य सजवून समूहगानात वाजवले जाते.

या वाद्याच्या तालावर बेफाम होऊन भगत नाचतो. कणसरी देवीच्या प्रार्थनेची ही परंपरा आहे.

घांगळी हे वनवासी लोकनृत्यात वाजविले जाणारे पारंपारिक वाद्य आहे. सणवार, भूमाता आणि कणसरी देवता या उत्सवात विशेषत: वारली समाज साजश्रृंगार लेवून नृत्य करतात. भूमातेकडून मिळालेलं वाद्य घांगळी आहे अशी वनवासींची श्रद्धा आहे. घांगळी वाजवताना गाण्यासोबत कथाही लावली जाते. मोरपिसे, काचेच्या रंगीत बांगड्या, आरसा किंवा बोटांच्या साहाय्याने घांगळी हे तंतुवाद्य वाजवले जाते.

भांगसरथळा हे वाद्य ‘सरपट' नावाच्या झाडाच्या काठीच्या खालच्या टोकाला एक विशेष प्रकारचे मेण लावून ती काशाच्या थाळीच्या पृष्ठभागावर चिकटवून बनवितात. वरपासून खालपर्यंत काठीवर अंगठा आणि तर्जनीने कंपन निर्माण करून त्याच्या लयीवर वनवासी कथा सांगतो. याला थाळगान म्हणतात. वारली आणि कोकणा समाजात ठाणे, नाशिक जिल्ह्यात थाळगान सर्रास रूढ आहे.

वनवासी स्त्रीपुरुष सुगीच्या दिवसात मोठ्या उत्साहाने ढोलनाच करतात. वनवासींमध्ये विविध प्रकारचे आणि आकाराचे ढोल ढोलक्या प्रचारात आहेत. माडिया लोकांचे ढोल तीन-साडेतीन मीटर लांबीचे असतात आणि दोन ते तीन फूट व्यासाचे असतात. त्याच्या मध्यभागी चिक्कणमाती लावलेली असते. हा ढोल वाजवताना गव्याचे शिंग असलेले शिरस्त्राण डोक्यावर धारण करतात. बांबूच्या कामट्यांवर हे शिरस्त्राण बसवून त्याला मागच्या बाजूने मोरपिसे, कोंबडीची पिसे

आणि पुढच्या बाजूला गव्याची शिंगे मढवलेली असतात. पारंपारिक

२४

विश्व वनवासींचे