पान:विश्व वनवासींचे.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडादेव या ग्रामदेवतांची वनवासी पूजा बांधतात.

समृद्ध लोकसंस्कृती आणि प्रतिमा विश्व

 वनवासी लोकसाहित्यातून निर्मात्याच्या समृद्ध प्रतिमा विश्वाचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे समृद्ध लोकसंस्कृतीचीही जाणीव होते. मौखिक परंपरेने चालत आलेल्या वनवासींच्या लोकसाहित्यातून लोककथा, लोकगीते, म्हणी, वाक्प्रचारातून, लोकविधी आणि लोकश्रद्धांमधून वनवासींची आगळी जीवनशैली आणि संस्कृती आपण समजून घेऊ शकतो. त्यांच्या संस्कृतीची पाळेमुळे मौखिक साहित्यातील प्रतिमाविश्वात दडलेली आहेत. एक व्यापक वैश्विक मानवतावादी अशी ही संस्कृती आहे. या संस्कृतीत आतिथ्यशीलता, समरसता, माणुसकीचा गहिंवर आणि एकात्मता जाणवते. याला लोकसाहित्याचा पुरावा आणि वारसा आहे. वनवासींचा डोंगऱ्या देव म्हणजे डोंगरातला महादेवच आहे किंवा त्यांच्या विवाह संस्कारातील विवाहापूर्वी गायिले जाणारे 'ढवळगाण' व 'ढवळी' स्त्री म्हणजे धवलगिरी पर्वतावरील शंकर पार्वतीच्या लागलेल्या लग्नाच्यावेळचे ते गाणे आहे.

 भिल्लांच्या बोलीभाषेतील बारशाच्या लोकगीतात स्त्रीयांनी देवाधर्माचे स्तवन केले आहे. हे एक धार्मिक गीत आहे. “वरखडीला जीवानी गाडी सजने शंकरदेवजी पार्वती नटती लक्ष्म्या आईने पूजा भोपनी शंकर देवनी पूजा थोपवी.”

 डॉ.रमेश कुबल यांनी वनवासी नाटक या लेखात नमूद केल्याप्रमाणे 'वनवासींच्या धर्माचरणात भक्तीबरोबरच सर्जन आणि आस्वाद या क्रिया एकाचवेळी घडत असल्यामुळे वनवासींचे धर्माचरण विधी, कलाप्रकार कलाविष्कार म्हणून ओळखले जातात.' यांत यात्वात्मकता, प्रतीकात्मकता, प्राकृतिकता, मंत्रशरणता आणि आविष्कारातील हर्षनिर्भरता हे वनवासी धाटीचे पंचप्राण म्हणून त्यांनी उल्लेखिलेले आहेत. त्यात वनवासींची धार्मिकता, सामाजिकता सामावलेली आहे. त्यांचे हे धार्मिक पूजाविधी नृत्य, गायन, वादन, नाट्य, नाद, लय संगीताने भारलेले असतात. बोहाडा, कांबडनाच, ढोलनाच, तारपानृत्य, थाळगानात कणसरी पूजन, काज असे नाट्यात्मक विधी आणि विधीनाट्ये वनवासी संस्कृतीत आहेत. या साऱ्यांचे दर्शन

२२
विश्व वनवासींचे