पान:विश्व वनवासींचे.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा अभ्यास ग्रंथरूपात डॉ. सौ.अमिता मुजुमदार यांनी १९८८ मध्येच मांडलेला आहे. वनवासींचे लोकसाहित्य लोकनिर्मित असून ते लोकांसाठीच आहे. लोकांचे, लोकांसाठी वनवासी लोकांकडून निर्माण झालेले हे लोकसाहित्य आहे. लोकतत्त्वाने ते भारलेले, झापटलेले साहित्य आहे. त्यातून वनवासींच्या स्व-लोकाभिमुखतेचा अनुभव येतो. वनवासी समाज, धर्मजीवन आणि साहित्याचे आकलन होण्यासाठी या वनवासींच्या लोकसाहित्याची फार मोठी मदत निश्चित होऊ शकेल. वनवासींच्या सांस्कृतिक इतिहासाला त्यांच्या लोक साहित्याच्या अभ्यासाने अधिक उजाळा मिळेल. लोकभ्रम, लोकविधी, लोकश्रद्धा आणि लोकविद्या, वनवासी लोक दैवतांचा बोध होईल. समूह मनाच्या या आविष्काराला असलेल्या परंपरेची ओढ स्पष्ट होईल. यासाठी वनवासी लोकसाहित्यातील लोकतत्त्व आकलनाला आणि लोकमाध्यमाच्या अभ्यासाला महत्त्व आहे.

आदिवासींचे मौखिक साहित्य

  वनवासी लोकसाहित्य, लोकसाहित्याचे वैशिष्ट्य म्हणून मौखिक परंपरेनेच आपल्यापर्यंत येऊन पोहचले आहे. त्याला जनसाहित्य म्हणता येईल. त्यात लोककथा, लोकगीते, जानपदगीते, देवा माणसांच्या जन्म मरणाच्या कथा, म्हणी, वाक्प्रचार, कोडी, उखाणे, सर्व प्रकारच्या लोकविद्या यांचा समावेश होतो. या साहित्याचे शब्दसौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य अभ्यासण्याजोगे आहे.

 वनवासींची निसर्गावरील भक्ती, बोली भाषेचे लोभस आणि लाघवी स्वरूप, नाते-संबंधाच्या वर्णनातील जिव्हाळा, लोकसमज साहित्याला अस्सल देशीवळणाने नेणारे आहे. निसर्गाशीच वनवासी मुक्तसंवाद साधीत असे. त्यामुळे वनवासी लोकसाहित्यात विविधता आढळते. वनवासींच्या परंपरेने चालत आलेल्या काही समजुती आणि आडाखे लक्षात घेण्याजोगे आहेत. 'मुंग्या आपली अंडी वर घेऊन चालल्या की समजावे यंदा भरपूर पाऊस पडेल. कारण त्या मुंग्या आपली अंडी सुरक्षित जागी हलवितात.' कावळ्याने घरटा शेंड्यावर बांधला की समजावे यंदा पाऊस कमी पडणार. झाडाच्या मध्यावर खोडाशी बांधला तर पाऊस वारा, वावधान जास्ती होईल. जमिनीत कीडेकीटक झाले, पिंपळ हिरवागार झाला, गुलमोहर आगीसारखा

२०

विश्व वनवासींचे