पान:विश्व वनवासींचे.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनवासी लोकसाहित्याचे स्वरूप

 खऱ्या अर्थाने लोकसाहित्याचे स्वरूप उलगडवून दाखविण्याची क्षमता असलेले वनवासी लोकसाहित्य आहे. ते 'आदिम' म्हणजे अतिप्राचीन तर आहेच, त्याचे कूळ आणि मूळ शोधणेही अवघड आहे. ते मौखिक स्वरूपातच आजही आढळते. लिखित लोकसाहित्यात वनवासी साहित्याचा फारसा समावेश झालेला दिसत नाही. शासनाच्या लोकसाहित्य संकलन समितीने हे काम जाणीवपूर्वक हाती घेणे गरजेचे आहे.

लोकमानस आविष्कार

 वनवासी लोकसाहित्यात लोकमानस उत्कटतेने आणि प्रभावीपणे आविष्कृत झालेले आहे. लोक समूहाची ती सांधिक निर्मिती आहे. समूहाचे मन त्यातून अभिव्यक्त होते. समुदायाच्या भावना त्यातून साकार होतात. वनवासी लोकसाहित्यात लोकसंस्कृती जतन करून ठेवलेली आहे. हा अनमोल ठेवा एवढ्यासाठीच जपला पाहिजे. आता तो लिखित स्वरूपात प्रकाशित होण्याची तीव्र गरज आहे. वनवासी जीवनमान आणि राहणीमानाची त्यातून सुयोग्य कल्पना येऊ शकेल. वनवासी समाजाचे जगणे, सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दिनचर्या त्यातून स्पष्ट होईल. तसेच त्यांचे सण, वार, जन्म, विवाह आणि मर्तिकाचे संस्कार, व्यवहार कळतील. त्यांची श्रद्धास्थाने, देव देवता, उपचार तंत्र, विश्वास, समज अपसमज कळतील. तत्कालीन रूढी, लोककलेचेही ज्ञान त्यांतून होईल.

वनवासी लोकसाहित्यातील लोकतत्त्व

 आज लोकतत्त्व (Folk elements) विचाराला साहित्यात विशेष महत्त्व आले आहे. त्यातूनच लोकतत्त्वीय समीक्षा आकार घेत आहे. लोकसाहित्यात हे लोकतत्त्व अनुस्यूत आहे आणि समर्थ, कसदार साहित्यात या लोकतत्त्वाचा प्रत्यय येतो. वनवासी साहित्यात विशेष रूपात या लोकतत्त्वांची जाणीव होते. लोकसाहित्यातील लोकतत्त्वांच्या अभ्यासाला आता गती येत आहे. प्राचीन मराठी वाङ्‍‍मयातील लोकतत्त्व

१९