पान:विश्व वनवासींचे.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेवत आहे. नागवले गेल्याची त्यांना चीड आहे. धर्म, संस्कृतीपासून आपल्याला वंचित ठेवल्याची त्यांची भावना नाही. निसर्ग हाच देव आणि विकासापासून कोसोदूर राहण्यातच त्यांनी बेधुंद आनंद मानला. माणसाच्या स्वतंत्र समतेचा निर्भय पुरस्कार असे स्वरूप वनवासी साहित्याला प्राप्त झाले आहे.

व्यक्तिगत आणि समूह अनुभवाची अभिव्यक्ती

 वनवासी कविता या अनुभूतीच्या संदर्भात तपासावी लागेल. अदिवासी कविता (१९७६), मोहोळ (१९८२), वनवासी (१९८४), गोधड (१९८७), गोंडवन पेटले आहे (१९८७), उलगुलान (१९९७), इंद्रियारण्य (१९९०), वणसूर्य (१९९१), जागवा मने पेटवा मशाली (१९९१), आरडगे कुहुबाय ऽऽ (२०१२) या भुजंग मेश्राम, उत्तमराव धोंडगे, वाहरू सोनवणे, विनायक तुमराम, नीलकांत कुलसंगे, पुरुषोत्तम शेळमाके, वामन शेळमाके, लक्ष्मण टोपले इत्यादींच्या कवितांमधून याच व्यक्तिगत आणि सामुदायिक अनुभवाची प्रतिभाजनित कलात्म पातळीवरील अभिव्यक्ती होताना जाणवते. त्यात भवितव्याबद्दलचा आत्मविश्वास आढळून येतो. याशिवाय प्रभू राजगडकर, अमित गडकर, उषाकिरण अत्राम, नरेंद्र पोयाम, एस्.री. मडावी, बाबाराव मडावी इत्यादी कवींच्या कवितातूनही वनवासींची हीच मनोवस्था दिसते. वनवासींच्या समृद्ध सांस्कृतिक व कलात्मक जीवनाचा साक्षात्कार अद्याप या कवितेने प्रगट करावयाचा आहे. केवळ वेदना, विद्रोह, धर्मनिष्ठा, दांभिक सांप्रदायिकता मांडून काव्यात्मकतेला पारखे होऊन चालणार नाही. संस्कृतीचा समृद्ध वारसा जपत, प्रतिभेचा विमुक्त अविष्कारच वनवासी कवितेला आमूलाग्र श्रेष्ठ कलामूल्यांचे जतन करायला भाग पाडील असा विश्वास ही कविता देते. अशीच प्रचिती वनवासींच्या काथात्मक, नाट्यात्म, स्वकथनात्म साहित्यातून येते. त्याचा स्वतंत्रपणे विचार व्हावा.


***
१८
विश्व वनवासींचे