पान:विश्व वनवासींचे.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे पण त्याचा येथे वनवासी साहित्य विश्वात समावेश करता येत नाही. अन्यथा अशा प्रकारच्या साहित्याच्या संदर्भात व्याख्यांचाही पुनर्विचार आपल्याला करावा लागेल. तेव्हा 'जन्माने वनवासी असून त्याने निर्माण केलेले साहित्य' ते वनवासी साहित्य ही व्याख्या गृहीत धरावी लागते. मात्र वनवासीहून इतर लेखकांनी जाणीवपूर्वक वनवासींबद्दल केलेल्या निष्ठापूर्वक लेखनाचे भान ठेवावे लागणार आहे. अशा या मर्यादांमध्येच वनवासी साहित्यविचार करावा लागतो.

प्रकाशित वनवासी साहित्य :

 आज वनवासींच्या प्रकाशित साहित्याने लक्ष वेधले आहे म्हणूनच वनवासी मेळावे आणि साहित्य संमेलने भरत आहेत. विदर्भ महाराष्ट्रातील वनवासी बहुल भागाचा त्यात पुढाकार आहे. वनवासी नियतकालिके रुजत आहेत. वनवासींच्या आज उपलब्ध झालेल्या प्रकाशित लेखनातून पूर्वीच्या वनवासींच्या इतिहासाचे स्मरण, व्यक्तिगत पातळीवरील जीवनानुभव, राष्ट्रप्रेम, अस्मिता जागरण, संघर्ष, आत्मभान, स्वत:च्या संस्कृतीचे वेगळेपण आणि जपवणूक, सात्विक संतापाचे प्रगटीकरण, समाज प्रबोधन अशा अनेक मुद्द्यांना आविष्कृत केलेले आहे.

 दलित साहित्याच्या गदारोळात वनवासींचे शोषण, वेठबिगारी, वेदना, व्यथा याचा फारसा विचार झालेला नाही. दऱ्या खोऱ्यातील एक्कलकोंड्या जीवनाची दखल घेतली गेली नाही. निसर्गाच्या सान्निध्यात एकीकडे निसर्गाला तोंड देत वनवासींनी साधलेला सुसंवाद आलेला नाही. त्याचा परिणाम म्हणजे वनवासींच्या साहित्याने फारशी जवळीक अन्य साहित्य प्रवाहाशी साधलेली दिसत नाही. वनवासी स्वत:च्या संस्कृतीत रमले, त्यातील सम्पन्नता त्यांना जाणवली. नागरी जीवनापासून त्यांना दूर राहावे लागले. सामाजिक न्यूनगंडापासून वनवासी अलिप्त राहिला. स्पृश्यास्पृश्याचा प्रश्नही उद्भवला नाही म्हणून त्या वनवासींच्या साहित्यात विद्रोहाची भाषा तीव्र नाही, सर्रास आढळत नाही. मात्र आधुनिक विकासात त्याला स्थान लाभले नाही याची खंत मात्र त्यांच्या साहित्यातून प्रगट झाली आहे. त्यांची स्वत्वाची जाणिव सतत

वनवासी साहित्य : एक दृष्टिक्षेप

१७