पान:विश्व वनवासींचे.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनवासींचे जीवनमान आणि राहणीमान

 वनवासींच्या विविध जाती, उपजातीं बरोबरच त्यांच्या विविध बोली, त्या बोलींचे व्याकरण इत्यादी अनेक अंगाने अभ्यासकांना विचार करायला भाग पाडले आहे. त्यामध्ये वनवासींचा इतिहास, त्यांची पूर्व परंपरा, वनवासींमधील गत क्रांतिकारक, या वनवासींचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विविध चळवळीतील वनवासी क्रांतीकारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील वनवासी सैनिक यांचा शोध घेऊन संशोधनपर ग्रंथांच्या निर्मितीला प्रारंभ झाला आहे. वनवासींचे चालत आलेले भारतीय संस्कृती जोपासणारे जीवनमान आणि राहणीमान याचे मूलगामी चिंतन होत आहे. पर्यावरण, वनौषधी, लोकसमजुती, लोकवैद्यक याचा सखोल अभ्यास करण्याची गरज लक्षात आली आहे. भारतीय विचारवंतांप्रमाणेच विदेशी अभ्यासकही या वनवासींच्या राहणीमानात आणि जीवनमानाच्या अभ्यासाकडे आकृष्ट झाले आहेत. त्यामुळे वनवासींच्या वैचारिक साहित्यातही सतत भर पडत आहे.

वनवासी आणि बिगर वनवासी

 वनवासी साहित्य निर्मिती, प्रेरणा, स्वरूप आणि भवितव्य याबाबत विचार करताना या लेखक वा साहित्यिकांचे आपोआप दोन गट लक्षात येतात. एक वनवासी समाजात जन्मलेले वाढलेले लेखक साहित्यिक आणि दुसरा वनवासींबद्दल कमालीची आत्मीयता, आपुलकी, बंधुभाव आणि अभ्यास केलेले परंतु बिगर वनवासी लेखक आणि साहित्यिक होय. त्यात समाजशास्त्र आणि इतिहास संशोधकही आहेत. या सगळ्या बिगर वनवासी आणि वनवासी लेखकांच्या नामोल्लेखांची येथे आवश्यकता नाही. त्यापेक्षा प्रथम वनवासी साहित्याची व्याख्या आपण सिद्ध केली पाहिजे. दलित साहित्याची व्याख्या ज्या पद्धतीने केली गेली त्याचप्रमाणे वनवासी साहित्याची व्याख्या होईल. “जो स्वत: जन्माने वनवासी आहे अशा वनवासी समाजातील लेखकसाहित्यिक त्याने लिहिलेले साहित्य त्याला वनवासी साहित्य म्हणावे." बिगर वनवासींनीही विपुल साहित्य या वनवासींबद्दल निर्माण केलेले

१६
विश्व वनवासींचे