पान:विश्व वनवासींचे.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनवासी साहित्य : एक दृष्टिक्षेप

 साहित्य वर्तुळात आता वनवासी साहित्य हे एक स्वतंत्र दालन प्रस्थापित झाले आहे. लोकशिक्षणाबरोबरच वनवासींमधील लेखकही जागृत होऊन लिहू लागले आहेत. मराठीमध्ये अन्य साहित्यिकाप्रमाणेच हा एक जोमदार साहित्य प्रवाह ठरत आहे. हे लक्षात घेता वनवासी साहित्य हे समीक्षकांच्याही चिंतनाचा विषय झाला आहे.

ललित साहित्य निर्मिती

 आता वनवासी साहित्याच्या प्रवाहाने आजवरच्या वैचारिक साहित्याच्या जोडीला ललित साहित्य निर्मितीसाठी विशेष जोर धरलेला आहे. मराठीमध्ये १९६० नंतरच्या ग्रामीण आणि दलित साहित्याच्या एका जोरकस प्रवाहात हा वनवासी साहित्याचा प्रवाह क्षीण होता. परंतु अलिकडील १९८० च्या दशकात व त्यानंतर वनवासी लेखकसाहित्यिकांनी बरीच मोठी मजल गाठली आहे हे स्पष्टपणे दिसून येते. त्यावेळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून या वनवासी साहित्य निर्मितीलाही प्रेरणा मिळत गेलेली आहे. याचे कारण मागास, उपेक्षित, दुर्गम डोंगराळ भागात राहून दऱ्या खोऱ्यात वावरणारेसुद्धा संथ गतीने का होईना पण सुशिक्षित झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या भाव भावनांना मुखरित केले. किंबहुना त्या भावना स्वाभाविकपणे मुखरित झाल्या असे म्हणता येईल. त्यातूनच मग वनवासी लेखकांची एक पिढी निर्माण झाली. या वनवासी साहित्यिकांच्या प्रेरणा नेमक्या कोणकोणत्या आहेत; वनवासी साहित्याचे स्वरूप कसे आहे, त्याची वाटचाल कशी होत आहे, वनवासींच्या मौखिक परंपरेतील लोकगीते, लोककला, लोकनृत्ये, लोकजागर त्याचबरोबर आधुनिक वाङ्‍‍मय प्रकारातील कविता, कादंबरी, चरित्र-आत्मचरित्र सदृश साहित्य यांचा समाज शास्त्रीय समीक्षादृष्टीने अभ्यास होऊ लागला.

१५