पान:विश्व वनवासींचे.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणीत सामावलेले आहे.

 भाया बसविणे, कंदोरी करणे, वाघबारस, वीर नाचवणे, काज करणे, पडकाई, कवळी भाजी, कणसरी कथा या सगळ्यात वनवासींच्या सांघिक, सामूहिक कृती-उक्तीचे प्रत्यंतर येते.

 गवताचे छप्पर आणि कुडाच्या भिंतीच्या या घरात राहणारा वनवासी वाडी, वस्ती करून राहतो. झाडपाला, कंदमुळे, सापाचा कंद, हालिंद कंद-वनस्पती रोजच्या आहारात खातो. वनवासी स्त्रिया धांदुक (अर्धे लुगडे) फडकी वापरतात. माणसाला किती कमी गरजात जगता येते याचे उदाहरण म्हणजे 'फडकं घे, मडकं घे अन् सूट...' ही बोलकी म्हण आहे. लाज राखायला फडके आणि पाणी प्यायला, अन्न शिजवायला एक मडके पुरे- ! उद्याचा- भवितव्याचा विचार करायला कष्टकरींना वेळच नाही. भावी पिढ्यांचीही काळजी नाही. 'मध' आणि 'डिक' विकून मीठ आणि (भारंभार) कांदे विकत अजूनही ते बाजारातून घेतात.

 रंगावरून नोटा मोजतात आणि सावकारांकडून नाडले जातात. वैद्यकीय उपचार घेत नाहीत - भगतावर अवलंबून मृत्युपंथाला लागतात. अजूनही मागासलेल्या जाती, ढोर कोळी, कातकरी किंवा काथोडी मेलेल्या गुरांचे मांस खातात आणि डोळ्यांतला मोतिबिंदू बाभळीच्या काट्याने काढतात. कुपोषणाने लहान मुलांचे मृत्यू होतात. समाजधुरीण वनवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा वापरतात.

 आज वनवासी समाजात फक्त महादेव कोळी आणि कोकणा या दोन उपजाती तुलनेने पुढारलेल्या दिसतात. पण मल्हार कोळी, वारली, 'क' ठाकूर, 'म' ठाकूर, भिल्ल/कातकरी, पारधी, टोकरा, सूर्यवंशी, चुंबळी, पखाली, पानकरी कोळी आणि कोरकू-गोंड या मागेच आहेत.

 वनवासींची उदार, उदात्त अशी नैतिकता, सौंदर्यदृष्टी आणि सामाजिकता यांना अबाधित ठेवून त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचे जतन करूनच त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आज आपण त्यांची मूळ-कृषि आणि वन-संस्कृती टिकवून; अज्ञान आणि दारिद्र्य नाहिसे करू शकलो, तरच धन्य होता येईल.

***
१४
विश्व वनवासींचे