पान:विश्व वनवासींचे.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रामाचा नैवेद्य असतो. ही निरागस मानव आणि निसर्ग याची प्रचिती आहे. असाच द्रोपदीचा वनवास वनवासी स्त्रियांना आपला वाटतो.

 परकीय आक्रमणे होऊनही वनवासी जनांच्या मनामध्ये हे दोन्ही ग्रंथ रुजलेले आहेत. लोक गीतातील विविध ठिकाणी रुळलेल्या नुसत्या गौळणी पाहिल्या तरी रामायण व महाभारत किती खोलवर वनवासींच्या जीवनात पोहोचले होते याची कल्पना येते.

 एक लोककथा पाहा. पांडव वनवासात असताना एका झोपडीत राहतात. तेथे त्यांना कृष्ण भेटायला येतो. मध्यरात्री भेटून झाल्यावर झोपायचे असते पण कृष्णाला त्या वनवासींच्या झोपडीत जागा नसते, तेव्हा कृष्ण एका झाडावर झोपतो. पाची पांडव तसेच दाटीवाटीने झोपतात. पहाट होताच कृष्ण सूर्यदेवाला सांगतो की, “ या झोपडीतील पाडवांना प्रकाश दे आणि या वनवासींच्या घरात सोने उधळ.' असा आशीर्वाद देतो. याचा अर्थ कृष्णाने झोपडीचे रात्रभर रक्षण तर केलेच पण सकाळी जाताना ती वनवासी झोपडी सोन्याची केली. तेव्हापासून वनवासी सूर्यभक्त झाले.

 नागरी व आदिम वनवासींमध्ये अंतर्गत व्यवहार आपुलकीचे जिव्हाळ्याचे आणि रक्ताचे होते. जाती होत्या, पण जातीची बंधने नव्हती. हे रामायण महाभारतातील अनेक कथांमधून आणि व्यक्तिरेखांमधून दिसून येते. रामाने रावणाला पराभूत केले तेव्हा रामाला विविध जातीतील वनवासी बांधवांनीच साहाय्य केले होते. ते सगळे प्रामुख्याने दक्षिण भारतातील वनवासी होते. श्रीरामाने रावणावर चाल करण्यासाठी कातकरी समाजातील वनवासींना आपल्याबरोबर घेतले होते. श्रीरामाचा विजय झाला तेव्हा त्या श्रीरामाच्या आशीर्वादाने माकड वंशातील कातकरींना मानवी रूप प्राप्त झाले असे ते वनवासी मानतात.

 महाभारतात उल्लेख केलेल्या 'पंचजन'पैकी असा हा वनवासी समाज आहे. रामायण काळापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीचा वारसा वनवासी समाजाने जतन केला आहे.

***

वनवासी समाज: रामायण आणि महाभारत कथा

१५९