पान:विश्व वनवासींचे.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिल्पकलेचे त्यांच्या नकळत “मार्केटिंग' आंतरराष्ट्रीय पातळीवरील करणारे 'गट' - दलाल यातूनच निर्माण झालेले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वारली पेंटीग्ज महत्त्व पावली आहेत. हा आदिवासींच्या सौंदर्यदृष्टीचा ठोस पुरावा आहे. तांदळाच्या पीठाने शेणाच्या झोपडीवर काडीने उमटवलेली, रेखाटलेली ही चित्रकला, हेच ठसे आंतरराष्ट्रीय मान्यता पावले आहेत.

 वनवासींचे लोकसाहित्य मौखिक परंपरेने चालत आलेले आणि जतन केलेले आहे. त्यांच्या विवाहातील गाणी, रीती, धवल गीते, कामडी-गौरी गीते, कथा श्रवणीय आहेत. या माध्यमांतून निसर्गाच्या साक्षीने हे सौंदर्यशास्त्र ओसंडते आहे. भावना आणि संकेत यांचा हा मेळ आहे. देव्हाऱ्यात ठेवूनच ते तारपा, वाद्ये आणि चित्रे पुजितात; ही श्रद्धा त्यांच्या मुळाशी आहे. गीतांमध्ये सौंदर्य लय आहे. अंतर्गत लय आणि नाद आहे. याचे हे उदाहरण पहा...

 'नंदा रडू नको गं मनामधी । तुला दिल नाही गं वनामधी ।।

  तुझी सासू आहे गं आईवानी । तुला वागवीन गं लेकीवानी ।।

 मुलगी सासरी जात असतानाचे ही गीत भावसौंदर्य परिपूर्ण आहे.

 वनवासींच्या 'थाळगाना'चीही किमया अशीच आहे. हे थाळगान सौंदर्यशास्त्रीय दृष्टीचेच द्योतक आहे. काशाचा थाळा, काळे मेण, सोराट्याची पोकळ २/३ फूट उंचीची काडी ही त्याची सामग्री. काशाच्या थाळ्यात मेण मध्यभागी चिकटवितात. त्यात सोराट्याची काडी रोवतात आणि कथेकरी आपल्या दोन्ही हातांच्या आंगठा आणि तर्जनीचा वापर करून वरपासून खालपर्यत त्या काठीवर हात फिरवून थाळीतून सुमधुर स्वरकंपने काढतात आणि धार्मिक कथा लावतात. तो कथाकार मध्यभागी आणि श्रोते गोलाकार सभोवती बसून म्हणाल तितक्या वेळ नादमय - स्वरबद्ध कथा ऐकतात. हे सारे सुंदर आहे.

 वनवासींच्या सामाजिक परिमाणांचा, निकषांचा समावेश त्यांच्या नैतिकतेचा आणि सौंदर्यशास्त्रीय दृष्टीचा विचार करताना स्वाभाविकपणेच ओघात झालेला आहे. वस्तुत: त्याचे वेगळे विवेचन करण्याची फारशी आवश्यकताही नाही. पण वनवासींचे सण, उत्सव, प्रथा, म्हणी, शब्दकळा, उखाणे, वाक्प्रचार सगळेच लक्षवेधी आहे. त्यांचे पर्यावरणशास्त्र

   वनवासी : नैतिक, सौंदर्य शास्त्रीय आणि सामाजिक परिमाणे

१३