पान:विश्व वनवासींचे.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राम म्हणतात. रामाचे वनवासीतील दिवस हेच रामायणातील विशेष लक्षणीय होते. वनवासींच्या सहवासात हा सगळा त्यांचा काळ गेलेला आहे. त्यामुळे रामाने अगदी जवळून हे वनवासी जीवन निरखले आहे. वनबंधूंना जाणले आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सचोटी, आत्मीयता सरळ जीवन अनुभवले आहे. त्या जीवन संस्कृतीचा रामावर प्रभाव पडला आणि रामाने पुढे वनवास संपल्यावर त्याच इमानदारीने प्रजासत्ताक राज्य कारभार सांभाळला.

 वनवासी समाजाच्या आचरणामध्ये माणसाला ईश्वर बनविण्याचे सामर्थ्य निश्चित आहे. तोच प्रभाव रामावर पडलेला दिसतो. रामाला भेटलेल्या हनुमंतानेही असेच मित्रत्वाच्या नात्याने प्रभावित केले होते. संपूर्ण वनवासात साहाय्य केले. परस्परांचा विश्वास संपादन केला म्हणूनच सीता शोध त्याच्यावर सोपविला होता. श्रीलंकेलाही पाठविले होते.

 वनवासी समाजातील लोकही राजा झालेले आहेत. उदा:मुंडा, गौंड, खासी या राजांचा इतिहास उपलब्ध आहे. या राजांमध्येही रामायणाशी मिळतीजुळती प्रथा आहे. राजाचा मोठा मुलगाच राजगादीवर बसतो. भरतानेही रामाच्या पादुका ठेऊन राज्य केले. मुंडा वनवासींमध्येही "मुंडा मानकी'पद्धत आहे. रामायणात आणि वनवासी यातील हे साम्य लक्षणीय आहे. रामाने प्रेमाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली याचा अर्थ वनवासी-नगरवासी असा भेद नाही. त्यात सामाजिक समरसतेचा सद्भाव आहे. वनवासी समाजात अनेक उपजाती आहेत पण त्यांच्यात स्पृश्य-अस्पृश्य हा प्रकार नाही. राम लंकेवर चढाई करताना शिवलिंगाची पूजा करतो. वनवासींमध्येही शिवलिंगाची पूजा आहे. फार तर त्याची नावे वेगवेगळी आहेत. मरंग बुरु (= मोठा पहाड, झारखंड), गोरेया बाबा (त्रिपुरा) तर गौंड लोक यालाच बडा देव म्हणतात. शंकर हा वन देव आहे. तो वाघाचे कातडे नेसतो आणि गळ्यात नाग बाळगतो. वनवासी आपले गोत्र झाड, वृक्ष, प्राणी यांच्या नावात जपतो. रामायणातही लव कुश ही दर्भाचीच नावे आहेत. विशेष म्हणजे वनवासी, जर जुळी मुले झाली तर त्यांची नावे

वनवासी समाज: रामायण आणि महाभारत कथा

१५७