पान:विश्व वनवासींचे.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासी समाज : रामायण
आणि महाभारत कथा

 आपली भारतीय संस्कृती वनामध्ये उपजली, पोसली आणि सुविकसित झाली. जगाची निर्मिती झाली तेव्हा सुरवातीपासूनच लोक वनात राहत होते. वन हाच त्यांचा सर्वार्थाने आधार होता. निसर्ग हाच त्यांचा देव होता. अध्यात्मिक आधार होता.

 युगानुयुगे हा वनवासी समाज भारतीय समाजाचा आणि संस्कृतीचा अभिन्न अंग बनलेला होता. भारतीय साहित्य, वेद, पुराण, रामायण, महाभारत यामध्ये त्याला विशेष स्थान आहे.

 आपण जर रामायण आणि महाभारत याचा अभ्यास केला तर वन आणि वनवासी यांच्या विना ही दोन्ही आर्ष महाकाव्ये अपूर्ण आणि अर्धवटच वाटतील. राजा दशरथाला तीन राण्या होत्या. कौशल्या, कैकयी आणि सुमित्रा. कौशल देशाची कौशल्या तर कैकेय देशाची कैकयी होती. आज वनवासींमध्ये हीच प्रथा आहे. स्त्रियांना त्यांच्या गावाच्या नावावरून ओळखले जाते. वनवासींमध्ये सुनेला गावाच्या नावाने बोलावतात. त्यातून गावाचे विशेष जपले जातात. मुंडा भाषेत सीता याचा अर्थ सितन म्हणजे नांगर चालविणे आहे. त्यावरून नांगर चालविताना जनक राजाला सापडलेली कन्या म्हणून तिचे नाव सीता झाले. प्रथेनुसार जनकपूरहून सीता अयोध्येला विवाहानंतर आली. तेव्हा तिला जानकी नावाने ओळखले गेले. लग्नाआधी ती सीता या नावानेच परिचित होती. स्वयंवरानंतर मात्र जानकी झाली. रामायणात आधी सीता हेच नाव आले. जानकी असा उल्लेख विवाह पूर्वी रामायणात कुठेही आलेला नाही. वनवासी समाजात या गोष्टीला मान्यता आहे. रामायणात रामाला १४ वर्षे वनवास भोगावा लागला. त्या काळात त्याची हनुमानाशी झालेली भेट ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. राम १४ वर्षे वनामध्ये राहिला म्हणूनच त्याला वनवासी

१५६