पान:विश्व वनवासींचे.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जंगलातील पाने, रंगीबेरंगी फुले, पक्ष्यांची पिसे यातले सौंदर्य वनवासींनी टिपले आणि त्याचा उपयोग त्यांनी दगिन्यांपेक्षाही सरस पद्धतीने प्रत्यक्षात केलेला आहे. 'जव्हार'चा दसरा पाहण्यासारखा असतो. रंगीबेरंगी फुलांनी नटलेल्या वनवासी स्त्रिया वाद्यांच्या गजरात मोठ्या तालासुरात नाचत पाड्यापाड्यांतून निघून जव्हारच्या 'हनुमान पॉईंट'वर अजूनही त्याच श्रद्धेने एकत्र येतात. तेव्हा वनवासींच्या आगळ्या सौदर्यदृष्टीची आणि साधनेची ओळख पटते.

 वनवासीच्या सौंदर्यशास्त्रीय परिमाणांचा विचार करताना त्यांच्या अंगभूत कलागुणांचा आविष्कार महत्त्वाचा ठरतो. वनवासींची लाकडीभांडी, मातीच्या बनविलेल्या वस्तू, मुखवटे, बांबूंच्या वस्तू, झाडपाल्यापासून विविध नैसर्गिक रंग तयार करण्याची पद्धती, भांड्यांवरील नक्षीकाम, विणकाम, भरतकाम, चटया, टोपल्या, त्यांचे आकार पाहिले म्हणजे याची पुरेपूर कल्पना येते. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा - कदाचित ते त्यांना परवडत नाही म्हणूनच - पर्यायी दागिने - मोरपिसे, कवड्या, शिंपले, प्राण्यांची शिंगे यापासून ते तयार करतात. निसर्गाची पूजा एकीकडे बांधणारा हा वनवासी ऊन, पाऊस, वारा, वादळ यांना सतत सामोरा जात असतो.

 वनवासींजवळ सौंदर्यदृष्टी आहे. मात्र तिला समृद्धीची आणि पारंगत करणारी कौशल्ये देण्याची जोड नाही. आज त्या त्या क्षेत्रांतील जाणकारांकडून प्रशिक्षण त्यांना मिळत नाही. कलेच्या सादरीकरणाचीही सुव्यवस्था नाही. या साऱ्यांच्या अभावीदेखील वनवासींची कलोपासना सद्गुणसम्पन्न आणि अव्यभिचारी निष्ठेने चालूच आहे. यात त्यांच्या सर्वच ललित कलांचा समावेश करावा लागेल. त्यात नाट्य, संगीत, चित्र, शिल्प, साहित्य यांचा समावेश होतो. वनवासींची नृत्ये, वाद्ये, चित्रकला, शिल्पकला, कसरतीचे नाच, संवादनाट्य सारेच मनोरंजनाच्या भक्तिभावाने तल्लीनतेमधून साकार झालेले आहे. मग तो तारपा नाच असो, नाही तर ढोल नाच असो. बोहाड्यातील विविध देवदेवतांना मिरवतानाचे वेगवेगळ्या प्रकारचे नाच असोत; उपाशी पोटीही ही धुंदी बेहोषी एक दुर्मिळ कला आहे.

 वनवासींच्या हस्तकलेचे, वारली चित्रकलेचे, समूह नृत्याचे,

१२
विश्व वनवासींचे