पान:विश्व वनवासींचे.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. पण एवढ्यावर भागत नाही. त्या उपलब्ध लोकसाहित्याची संगती लावणे, त्यावर चिंतन, सखोल होणे आवश्यक आहे. नुसते संकलन, संपादन हे संग्राहकाचे काम आहे. संशोधकाचे नाही. त्याला नवा अन्वयार्थ, सिद्धान्त आणि सामग्री याचे विश्लेषणासह नाते निर्माण करून दाखवावे लागते. जरी हा अभ्यास पूर्वी झालेला नसला आणि तुम्हीच ते संकलन केल्यामुळे अधिकारी ठरत असाल तरी अभ्यास विषयाचे उद्दिष्ट, संशोधन पद्धती, समीक्षा दृष्टी, विश्लेषणसंश्लेषण सामर्थ्य, नव्या अभूतपूर्व अशा विचारांची मांडणी येथे अपेक्षित आहे. त्यासाठी ही संकलित सामग्री केवळ आधार आहे. त्यानंतरच खरी अभ्यासाची सुरुवात होते.

 प्रादेशिक पद्धतीने लोकसाहित्याच्या अभ्यासाचा विचार करावयाचा झाल्यास ठळक प्रदेश वैशिष्ट्यांसह, लक्षात घ्यावे लागतील. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, वहाड असे ते भाग कल्पून मर्यादित, कमी व्याप्तीचे विषय घेऊन हे संशोधन करता येईल. त्यात लोकसाहित्याचा विशिष्ट प्रकार, एखादाच अभ्यासाला घ्यावा किंवा बोली म्हणून त्याचा अभ्यास करावा. त्यासाठी सर्वेक्षण, पाहणी, संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे करावी लागेल. त्यातच मग एखादा विशिष्ट जिल्हा घेऊन अथवा संशोधनाला वाव असलेला तालुका घेऊनही तेथील लोकसाहित्याच्या सर्व प्रकारांचा अभ्यास सिद्ध करता येईल. विशिष्ट जात, जमात घेऊनही त्याचा सगळा तपशील नोंदवून नव्याने माहिती प्रकाशात आणता येईल. उदाः कातकरी, वारली, महादेव कोळी, कुणबी, बेलदार, भिल्ल इत्यादी. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी लोकसाहित्याचा अभ्यास, सटाणा बागलाण तालुक्यातील भिल्ली लोकसाहित्याचा अभ्यास, गोपाळ, गोल्ला जमातीचा अभ्यास, कन्नड, हिंगोली, निफाड तालुक्यातील लोकसाहित्याचा अभ्यास असे हे अभ्यास प्रारंभिक म्हणून यशस्वी झालेले आहेत. लोककला, लोकवैद्यक आणि बोलींच्या संदर्भात आजवरच्या अभ्यासात प्रकरणे आहेत. म्हणी, उखाणे, वाक्प्रचार, कोडी यांचे संकलन या निमित्ताने झालेले आहे.

लोकसाहित्याच्या अभ्यासाची नवी दिशा

१४७