पान:विश्व वनवासींचे.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरोग्यदायी राहणी, समज, संघटनशक्ती याचे वेगळेपण ध्यानात येते. आरोग्यरक्षणाचे काही आडाखे, मनोरंजनाच्या सुलभ परी इत्यादी गोष्टी लक्षात येतात.

लोकसाहित्य अभ्यास पद्धती

 लोकसाहित्याच्या अभ्यासाची कोणतीही एकच एक अशी ठरीव पद्धत आहे असे म्हणता येणार नाही. लोकसाहित्याचे संशोधन हे अनेक तऱ्हेने, अनेक अंगांनी, आशयलक्षी प्रकारचेही आपल्याला करता येईल. हा अभ्यास आपापल्या विविध उद्दिष्टांनुसार आपल्याला करता येईल.

 लोकसाहित्याचा अभ्यास म्हटले, की तो एका जागी टेबलखुर्चीवर बसून करावयाचा अभ्यास नाही. उपलब्ध पुस्तकांच्या आधारेही हा अभ्यास होणे अशक्य आहे. त्यासाठी प्रत्यक्ष त्या त्या निवडलेल्या क्षेत्रात, प्रदेशात, जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यापाड्यात संशोधकाला शब्दश: जीवाचे रान करून हिंडावे फिरावे लागेल. नसलेल्या ओळखी निर्माण कराव्या लागतील. वारंवार त्या त्या भागाला भेटी देऊन आपुलकी, आत्मीयता जिव्हाळा आणि जवळीक निर्माण करावी लागेल. मोठ्या विश्वासाचे वातावरण निर्माण केल्यावर मग मौखिक परंपरेतील अस्सल लोकसाहित्य बाहेर येईल. मग ते संकलित संपादित करणे शक्य होईल. विशेषत: ग्रामीण महिलांच्या, गतकाळातील मागच्या पिढीतील वृद्धांच्या मुखातून ते स्त्रवेल. त्या संबंधितांना बोलके करावे लागेल कारण मूळातच ग्रामीण भागातील मंडळी आपल्या बाबतीत अबोल असतात.

 सुदैवाने आता दृक् श्राव्य माध्यमे, सामग्री घेऊन खेड्या पाड्यात जाऊन पोहचता येते, म्हणून कॅमेरा, टेपरेकॉर्डर, व्हीडीओ शुटींग, डिजीटल सुविधांसह मोबाईलमधूनही आता फोटो आणि ध्वनी संग्रह करणे शक्य झाले आहे. प्रत्यक्ष पुरावा म्हणून या साधन सामग्रीसह या अभ्यास संशोधनासाठी पायपीट करणे आवश्यक झाले आहे. एका अर्थाने त्यामुळे हा अभ्यास संग्रहित करणे सुलभ झाले


१४६
विश्व वनवासींचे