पान:विश्व वनवासींचे.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकसाहित्यविषयक, लोकसाहित्यावर आधारित विषय घेतले जातात. त्यात प्रामुख्याने 'लोकगीत' हा गीत/पद्य प्रकार विपुल प्रमाणात अभ्यासार्थ उपलब्ध होत असतो. त्यानंतर 'लोककथा' ऐकायला भरपूर प्रमाणात मिळतात. त्याचप्रमाणे म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, कोडी, प्रहेलिका याही विपुल प्रमाणात उपलब्ध होतात. आज खेड्या पाड्यात ग्रामीण, अतिग्रामीण भागात ही सर्व सामग्री विखुरलेल्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आढळते. तुलनेने लोकनाट्य, लोकरंगभूमीवरील प्रयोग, त्याच्या संहिता कमी प्रमाणात उपलब्ध होतात. किंबहुना त्याचे सादरीकरण करणारी पिढी आता विरळ झाली आहे. अस्तंगतही होण्याची शक्यता आहे.

 परंतु लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे लोकगीत, लोककथा, म्हणी, उखाणे, प्रहेलिका, कोडी आणि लोकरंगभूमी एवढ्यापुरताच मर्यादित नसतो आणि तसा अभ्यासकांनी तो ठेवू नये. तर त्यात आणखी लोककला, लोकवैद्यक, लोकाचार, लोकसंस्कृती याचा तपशीलवार शोध घेऊन, त्याचाही समावेश करणे अत्यंत गरजेचे, महत्त्वाचे आणि अत्यावश्यक आहे. फार मोठा अलक्षित राहिलेला भाग, म्हणजे सर्वत्र फरकाने आढळणाऱ्या लोक बोलींचा अभ्यास होय. ऐतिहासिक आणि वर्णनात्मक नव्या भाषा विज्ञानाच्या पद्धतीनुसार हा अभ्यास झाला पाहिजे. बोलींचे भाषिक, भाषाशास्त्रीय अभ्यास माय मराठीच्या समृद्धीसाठी होणे आवश्यक आहे. तेव्हा लोकसाहित्याचे अध्यापन, अध्ययन आणि संशोधनात या काहिशा अलक्षित राहिलेल्या क्षेत्राला प्राधान्य देऊन हा अभ्यास झाला पाहिजे. लोकसाहित्याच्या क्षेत्रीय, प्रादेशिक अभ्यासातही अनेक दालने / क्षेत्रे अद्यापही आपल्याला अस्पर्शित आणि अलक्षित राहिलेली आढळतील. त्याकडेही आपले लक्ष वेधले गेले पाहिजे. स्वतंत्र बोलीभाषेचे शब्दकोष निर्माण व्हावेत; एवढे सामर्थ्य या अभ्यासात आढळेल. शिवाय विविध जाती जमातींचा ऐतिहासिक, दैनंदिनीचा, आचार धर्माचा, राहणीमान आणि जीवनमानाचा 'मोनोग्राफ' (Monograph = a treatise on a subject) या

१४४
विश्व वनवासीचे