पान:विश्व वनवासींचे.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लोकसाहित्याच्या अभ्यासाची
नवी दिशा

 लोकसाहित्याचे अध्यापन आणि अध्ययन आज सर्वच विद्यापीठातून होत आहे. या अभ्यासातून विविध लोकसाहित्यविषयक ग्रंथ आणि नियतकालिकातून स्फूट लेख प्रकाशित होत आहेत. त्याची फार मोठी लांबलचक यादीही देता येईल. पण अगदी अलिकडे 'लोकप्रज्ञा', लोकगंगा', 'लोकधाटी', 'लोकसाहित्यदर्शन', 'आदिवासी साहित्य विचार' या नव्याने प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा उल्लेख करावा लागेल. हे बहुतेक गौरवग्रंथ किंवा अनेकांचे संकलित केलेले लेखांचे संग्रह आहेत. त्यातूनच आपल्यापुढे प्रश्न निर्माण होतो, की हे लिखाण पुरेसे आहे का? हा लोकसाहित्याचा तात्त्विक, सैद्धांतिक पातळीवरील नव्याने सिद्धांत (Theory) मांडणारा अभ्यास होतो का? त्यात केले गेलेले लोकसाहित्याचे चिंतन, विश्लेषण लोकसाहित्याच्या समग्र, साकल्याने करावयाच्या आकलनास पुरेसे आहे काय? एक गोष्ट स्पष्ट आहे, की लोकसाहित्याच्या आकलनाला, विश्लेषणाला आणि सिद्धांताला ही सर्व सामग्री निश्चित पूरक आहे. पण त्यातून लोकसाहित्याचे समग्र सिद्धांत, विश्लेषण आणि मूल्यमापन झाले आहे असे म्हणता येत नाही. त्यासाठी लोकसाहित्याची, त्यांच्या संकलनाची, विश्लेषणाची, मूल्यमापनाची आणि सैद्धांतिक मांडणीची नवी दिशा आपण चोखाळली पाहिजे. त्या दृष्टीने येथे जो प्रयत्न केला आहे असे प्रयत्न होण्याचा आवश्यकता निर्माण झाली आहे.

 लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे काय?

 लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे विविध लोकसाहित्य प्रकारातील सामग्री गोळा करणे, जमविणे हा त्यातला पहिला प्राथमिक स्वरूपाचा टप्पा म्हणता येईल. अनेकदा पीएच.डी., एम.फील. अभ्यासासाठी

१४३