पान:विश्व वनवासींचे.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रूपांतर होईना! पण आपण कृतज्ञच राहायचे ही त्या वनवासींची मुळातली खरी मानसिकता आहे. उपाशी असला तरी कधीही वनवासी मालकाला सांगणार नाही. कष्ट उपसीतच राहील. चोरी करायची नाही. भीक मागायची नाही ही वनवासींची जीवनमूल्ये आहेत. पण त्यांच्या नशिबी या मुक्या आचरणातूनच वेठबिगारी लादली गेली. हे सावकारांच्या आणि तथाकथित उच्चभ्रूच्या नैतिकतेचे धिंडवडेच म्हणावे लागतील. या उलट दिलेल्या शब्दाला प्रामाणिकपणे जागणे, हे वनवासीचे जगणे आहे.

 आता वनवासींच्या सौंदर्यदृष्टीचा विचार केला तर असे लक्षात येते की, त्यांना निश्चित निसर्ग सहवासानेच, सौंदर्यदृष्टी आलेली आहेच. या सौंदर्याबद्दल त्यांची जाणीव उपजतच आहे.

 वनवासी स्वत: सुंदर आहेत, पण कष्टाच्या घामाच्या धर्मबिंदूत त्यांना त्यांच्या स्वत:च्या या अपूर्व सौंदर्याचे भानही नसते. किंबहुना आपल्या सौंदर्याबद्दलची जाणीव (कॉन्शसनेस) त्यांच्याजवळ नसल्याने त्यांचे हे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पण त्यांच्या त्या बेभान धुंदीतही सौंदर्यशास्त्रीय परिमाणे गवसतात. निसर्गसापेक्ष त्यांच्या या सौंदर्यविषयक जाणिवा आहेत. निसर्गाशी मनापासून एकरूप झालेल्या वनवासींनी सचेतन आणि अचेतन अशा दोन्हीतही पुरेपूर सौंदर्य पाहिले आणि आपली नकळत का होईना पण सौंदर्यदृष्टी प्रत्येक गोष्टीत ओतलेली आहे. म्हणूनच उघड्याने आंघोळ करणाऱ्या वनवासी स्त्रीला लाज वाटत नाही. तिच्या दृष्टीने पाहणाऱ्याच्या नजरेत पाप आहे.

 वनांचे-जंगलांचे स्वरूप, सौंदर्य अबाधित राहावे, त्यासाठी झाडतोड होऊ नये असे त्यांना वाटते. केवळ 'राब' तोडणे-कापणे वेगळे आणि जंगल झाडे तोडून उजाड करणे वेगळे. तेव्हा वनांचे संरक्षण व्हावे किंबहुना वनोपजावरच आपले संपूर्ण जीवन आणि चरितार्थ अवलंबून आहे म्हणून निसर्गाचा पूजक आणि सृष्टी सौंदर्याचा भोक्ता-उपासक वनवासी वनांना जपतो-राखतो. तेवढ्यासाठी 'देवराई'ची कल्पनाही समजून घेतली पाहिजे. देवासाठी राखलेली फळे कोणी उतरवीत नाही. देवाच्या नावावर ती आमराई आणि अन्य फळ-झाडे सोडलेली असतात म्हणूनच तिला 'देवराई' म्हटले आहे. ही कल्पना या वनांच्या संरक्षणातूनच रुजलेली असणार यात संदेह नाही.

वनवासी : नैतिक, सौंदर्य शास्त्रीय आणि सामाजिक परिमाणे

११