पान:विश्व वनवासींचे.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हळूहळू प्रमाण मराठीकडे नेऊन श्रवण, संभाषण, वाचन, लेखन ही भाषिक कौशल्ये निश्चितपणे वाढविता येतील. ६) प्राथमिक शाळेपर्यंत तरी वनवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बोलीतून खास तयार केलेली पाठ्यपुस्तके नेमली जाण्याची आवश्यकता आहे.

७) विद्यार्थ्यांसाठी प्रगत व सामान्य असे दोन अभ्यासक्रम असून त्यातील वनवासी विद्यार्थ्यांना सामान्य अभ्यासक्रम अभ्यासण्यासाठी निदान सुरुवातीच्या काळात तरी देणे आवश्यक आहे.

८) शैक्षणिक साहित्य, ग्रंथालये, वाचनालये यांचा अभाव हा शिक्षणाच्या मराठीच्या अध्यापनात वस्तुत: फार मोठा अडसर आहे. या बाबत पालक शिक्षक यांनी विशेष रस घेऊन तो दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज साधे मराठी शब्दकोशही ग्रामीण शाळांच्या ग्रंथालयात नाहीत. तेव्हा याबाबत विचार होऊन योग्य पूर्तता व्हायला पाहिजे.

९) वनवासी विद्यार्थ्यांना मुळात आवांतर वाचनाची गोडी नाही, अभिव्यक्तिसाठी पुरेशी शब्द संपत्तीही नाही. एक प्रकारची ही अनावस्था आढळते. भाषा सौष्ठवाचा अभावही जाणवतो.

१०) मातृभाषा अध्यापन उद्दिष्टांची जाणीव एकंदरीत शिक्षकांमध्ये दिसून येत नाही. भाषिक उद्दिष्टे पुस्तकातच छापली तर पालक व इतरजणही त्याबाबत जागरूक राहतील.

 क्रमिक पुस्तके, व्यवसाय मार्गदर्शक, अध्यापन, पुस्तिका इत्यादी अध्यापन सामग्री अभ्यासपूर्वक वापरली पाहिजे. परंतु केवळ या गोष्टींवरच शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी संपूर्ण अवलंबून राहू नये. शिक्षकांची संदर्भ साधने निश्चित विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असली पाहिजेत, म्हणजे मराठी भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात केलेला विद्यार्थी तयार होईल. तारतम्याने स्थानिक परिस्थितीनुसार भाषिक उद्दिष्टे अबाधित राखून त्यातील साचेबंदपणा सोडून आवश्यक ते फेरफार करायला हरकत नाही.

११) अध्यापकांनी दिलेल्या प्रश्नावलीतील श्रवण कौशल्यावर भर आढळला नाही. श्रवण कौशल्याबाबत काहीही प्रतिसाद मिळाला नाही. याचा अर्थ श्रवण कौशल्य वाढीबाबत एकूण संदिग्धता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याही मनामध्ये असली पाहिजे. संभाषण कौशल्याच्या


वनवासी विद्यार्थी मराठी सुधार : संकल्प चित्र

१२९