पान:विश्व वनवासींचे.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनवासी विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये वाढीच्या दृष्टीने केलेल्या अभ्यासातून खालील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

 १) इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत ग्रामीण, वनवासी प्राथमिक शाळातून वर्गातील बहुसंख्य वनवासी विद्यार्थांची बोली जाणून घेऊन तिच्या आधारे शिकविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हळूहळू बोलीकडून प्रमाण मराठीकडे या विद्यार्थ्यांना नेण्याचे उद्दिष्ट मात्र सतत डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. या दृष्टीने वनवासी विद्यार्थांची एकूण शिक्षणाची रूची वाढेल व त्याचा प्रतिसादही वाढेल.

 २) वनवासी विद्यार्थांना शाळेकडे आकर्षित व्हावे व पुढे ते शाळेत टिकून रहावेत यासाठी अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यासाठी पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम वनवासींना आपला वाटेल, जवळचा वाटेल असा असावा, म्हणजे निसर्ग, वनवासींचे सण, उत्सव, कृषिजीवन, संस्कृति, गरीबीशी झुंज या बाबींवर त्यात विशेष भर दिलेला असावा. याचा सुपरिणाम म्हणजे वनवासी विद्यार्थ्यांना अननुभूत परके असे काही त्यात वाटणार नाही. उलट, त्यांच्या ओळखीच्या खुणा या पाठ्यपुस्तकात त्यांना उमटलेल्या आढळतील व त्यांचा शिकण्यातील उत्साह वाढेल.

३) इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या मराठी भाषेच्या पुस्तकांचा या दृष्टीने विचार केल्यास त्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्याचे लक्षात येईल. निसर्ग सान्निध्यात रमविणारे मराठीच्या पाठ्यपुस्तकातील काही पाठ अप्रतिम आहेत. त्यांचा अपवाद वगळता अशा पाठात ग्रामीण वनवासी भागातील मुलांवर करण्याच्या संस्काराचा, त्याच्या विषयीच्या आत्मीयतेचा, त्यांना पुढे नेणाऱ्या सामाजिक प्रबोधनाचा एकंदरीत अभाव जाणवतो.

४) वनवासी भागात वनवासींची घरगुती बोली भाषा आणि शाळेत वापरात असलेली प्रमाण मराठी भाषा यांचा मेळ बसत नसल्यामुळे शिष्टसंमत मराठी लवकर आत्मसात करता न येणे हा ही एक त्यांच्या शिक्षणातील मोठा अडसर होऊन बसतो.

५) नव्या शैक्षणिक धोरणात मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले गेले तर त्यांचा सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे होत जातो, हे सर्वमान्य तत्त्व गृहीत धरले आहे. तेव्हा वनवासी मुलांना त्यांच्या बोलीतून शिकवित

१२८
विश्व वनवासींचे