पान:विश्व वनवासींचे.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेल पाहिजे आणि निदान पै-पैसा देवापुढे ठेवला पाहिजे. आमच्या घरी तेलही नाही आणि पैसाही नाही म्हणून आम्ही दर्शन घेत नाही, हे ऐकून अवाक झालो.

 येथे वनवासींच्या दारिद्र्यांचे दर्शन घडत असले तरी अडाणीपणाने नाही. उलट ते किती सुसंस्कृत विचार करतात, हे आढळते.

 "तुम्ही कोरा चहा - काळा चहा का पिता?" असा विचारलेला प्रश्न. पण त्याचे उत्तर सर्वांना अंतर्मुख करणारे आहे. “गाईचे दूध हे तिच्या वासरासाठी असते. ते आम्ही राखून ठेवतो त्या वासरासाठीच! माणसाला ते पिण्याचा अधिकार नाही.”

 वनवासी झोपडी बांधतानासुद्धा आधी सुरक्षित जनावरांचा गोठा बांधतात. आणि मग उरलेल्या जागेत माणसांना राहण्याची जागा बांधतात. त्यांचे पशुधन सर्वस्व आहे, त्यांची जपवणूक ही माणसाइतकीच केली जाते. ही वनवासींची परंपरा, वनवासींची ही 'दानत' लक्षणीय आहे.

 सामुदायिक विवाह जसे होतात तसाच त्यांचा ‘काज' हा सामुदायिक श्राद्धाचा प्रकार आहे. पाड्यावरचा बऱ्यापैकी सधन शेतकरी डाका वाजवून 'काज' पुकारतो. त्या वर्षभरातील मृत व्यक्तीच्या नावाने हा विधी होतो. भात पिकविणाऱ्या वनवासीला मात्र मातीचेच पिंडदान करावे लागते. मृत व्यक्तीच्या आवडीच्या वस्तूंचे प्रदान भगत-वीरांना होते. पण एवढ्यावर ‘काज' संपत नाही. शेतीची आणि कुटुंबाची गरज म्हणून विधुर पुरुष आणि विधवा स्त्री यांच्या जोड्या, स्त्रीच्या पदरात, केवळ बंदा रुपया बांधून जमविल्या जातात. अत्यंत करुण प्रसंग परंतु तेवढ्याच आस्थेने कुटुंबांचे पुनर्वसन ‘काज'मध्ये होते.

 वनवासी, म्हणजे जंगलचे राजे! पूर्वापार त्यांचे निसर्गाशी नाते चालत आलेले आहे. या वनातूनच त्याचा महोदार दृष्टिकोण विकसित झालेला आहे. निसर्गाला ते देव मानतात आणि या वनोपजावरही खरा अधिकार त्यांच्याच आहे. वनस्पतींशी त्यांनी सदैव जवळीक साधल्यामुळे त्यांना पारंपरिक वनौषधींची माहिती झालेली आहे. पण याच निसर्गाने त्यांना परोपकार शिकविलेला आहे. ते वनौषधी देतील, पण त्याचा मोबदला मागणार नाहीत. मग 'पैसा, मोबदला घेतल्यावर ती वनौषधी गुणकारी प्रभावी होत नाही.' अशा अंधश्रद्धेत का त्याचे

१०

विश्व वनवासींचे