पान:विश्व वनवासींचे.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासी महिला शिक्षण संशोधन : संकल्पचित्र

 (वनवासी विभागापर्यंत अजून शिक्षण पुरेशा प्रमाणात

 पोचले नाही. या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची

 आवश्यकता नवीन शैक्षणिक धोरणातही प्रतिपादन करण्यात

 आली आहे. या क्षेत्रातील शिक्षणाच्या समस्या अनेक

 आहेत. स्त्रियांच्या बाबतीत तर त्या अधिकच आहेत. या

 समस्या संशोधनातून जाणून घेतल्या व त्या दृष्टीने शैक्षणिक

 योजनांची आखणी व अंमलबजावणी केल्यास त्या अधिक

 फलद्रूप होतील. अशाच संशोधनाच्या एक संकल्पचित्राचा

 नमूना पुढे देण्यात येत आहे. विविध वनवासी विभागातही

 संशोधनासाठी तो प्रेरक व मार्गदर्शक ठरू शकेल.)

१) प्रकल्पाचे शीर्षक

 “लोकसंख्या शिक्षण आणि वनवासी महिला शिक्षण'

२) प्रकल्पाचे स्वरूप

 साधारणपणे १५ ते ४५ या वयोगटातील महिलांच्या शैक्षणिक परिस्थितीचा परामर्श घेणे. वनवासी क्षेत्रातील महिलांच्या शिक्षणातील समस्या सांस्कृतिक अडसर यांचा विचारपूर्वक शोध घेऊन त्याचा तपशीलाने अभ्यास या प्रकल्पात करावयाचा आहे. शक्य झाल्यास वनवासी महिलेची आर्थिक दुःस्थिती, परावलंबन, अंधश्रद्धा यांच्या निर्मूलनावर शिक्षण हा महत्त्वाचा उपाय आहे. हे लक्षात आणून देऊन एकंदरीत लोकसंख्या शिक्षणात वनवासी ग्रामीण महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून घ्यावयाचे आहे.

३) प्रकल्पाची गरज

 महिला शिक्षणाबद्दल आकडेवारीनिशी विपुल प्रमाणात बोलले, लिहिले जाते, पण प्रत्यक्षात महिला शिक्षणातील अडचणी कोणकोणत्या

१२०
विश्व वनवासींचे