पान:विश्व वनवासींचे.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्ष दिले गेले पाहिजे. वनवासींच्या आगळ्या शब्दकळेतून, प्रतिमांमधून त्यांच्या पारंपरिक वारशाचा उलगडा होतो. तेही या लेखनातून दिसून येते. भविष्यात वनवासी साहित्य प्रवाह समृद्ध व जोरकस होईल. मानव मुक्तीचे आणि सर्वांगीण विकासाचे सूत्र त्यांना गवसेल. या लेखिकेने व्यक्त केलेल्या विश्वासाशी माझी सहमती आहे. तसेच मराठी साहित्याला वनवासी साहित्याचे योगदान मौलिक-समृद्ध करणारे आहे हा आशावादही सार्थच आहे.

 मराठी वा अन्य साहित्यातील, प्रदेशातील प्रवाहांशी येथे तुलना केली नाही, फक्त महाराष्ट्रातीलच मराठी साहित्याचा विचार या ग्रंथात केला आहे या मर्यादेतच याचा विचार व्हावा.

 तथापि, लेखिकेने वनवासी साहित्याचा समरसून, अभ्यासपूर्ण, परिश्रमपूर्वक पुस्तकरूपात सादर केलेला हा प्रयत्न मराठी साहित्याला नुसता भूषणावह ठरणारा नाही तर अंतर्मुख होऊन चिन्तन करायला लावणारा निर्विवाद झाला आहे. मराठी जगताला सादर केलेल्या या परिपूर्ण ग्रंथ निर्मितीसाठी डॉ. उल्का निंबाळकर या खचितच अभिनंदनास पात्र ठरतील.

***

जंगल बोलींचा वेध : प्रस्तावना

११९