पान:विश्व वनवासींचे.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणीव ठेवून सुदूरदृष्टीने वनवासी जीवनाचा आणि साहित्याचा परिश्रमपूर्वक, सखोल व अत्यंत मूलगामी अभ्यास या दोन्ही ग्रंथातून केला आहे. वनवासी लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकविद्या या विषयात अनेकदा संकलन- फार तर विश्लेषण या पलीकडे अभ्यास होताना दिसत नाही. वृत्ती गांभीर्याने वनवासी साहित्याचा विमर्श घेणारी मांडणी झालेली दिसत नाही. डॉ. उल्का यांनी आस्वादक आणि साहित्यिक-कलात्मक अंगाने हे सारे लेखन केले आहे.

 वनवासी साहित्याची प्रेरणा, स्वरूप आणि चिकित्सा या विषयांची मांडणी येथे विस्ताराने पण नेमक्या स्वरूपात केली आहे. या ग्रंथात वनवासी साहित्य विषयक विविध मुद्दे अधोरेखीत झाले असून डॉ. उल्का यांनी त्याचे सूत्रबद्ध केलेले विवेचन वाचकांनी मुळातून वाचण्याजोगे आहे. वनवासी साहित्याच्या प्रेरणा वैयक्तिक, हेतुजन्य, परिस्थितीजन्य, मनोरंजनपर आणि सर्जनशीलही आहेत. या साहित्याच्या आशय आणि अभिव्यक्तीचा समीक्षा दृष्टीने विचार येथे केला आहे.

 वनवासी वैचारिक साहित्याची ही सुरुवात आहे. तरीही त्यातून वनवासी विचारधारा सुस्पष्ट होऊ लागली आहे. वंचित विकासाच्या नव्या वाटा त्यातून धुंडाळाव्या लागताहेत, लागणार आहेत. वनवासी बोलीतील - भाषिक वैशिष्ट्ये त्याची साहित्यातील योजना लेखिकेने विचारात घेतली आहे. बोलीचा वापर संवादासाठी आणि निवेदनासाठी केलेला आहे. डॉ. गोपाल गवारी यांची "कोळवाडा' ही कादंबरी संपूर्ण बोली भाषेत आहे हे आवर्जून नमूद केले आहे. हा बोली भाषेतील अपूर्व शब्दसंग्रह निश्चितच प्रमाण मराठीला समृद्ध करील, करणारा आहे. वनवासी साहित्यात आत्ममग्नतेची बीजे आढळतात. आत्म शोध आणि त्याला प्राप्त झालेले समूह निष्ठेचे रूप हे लेखिकेने वनवासी साहित्याच्या दिशा दिग्दर्शनात स्पष्ट केले आहे. पुढील पिढ्यांमध्ये समाज समरसता वाढीला लागेल, तसा तसा या साहित्याचा आविष्कारही बदलत जाईल.

 या ग्रंथातील देशीवादाचा मुद्दा मला विशेष लक्षणीय वाटतो. तो नव्याने मांडला जात असून त्याकडे समीक्षेच्या भूमिकेतून अधिक

११८
विश्व वनवासींचे