पान:विश्व वनवासींचे.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जंगल बोलीचा वेध : प्रस्तावना

शुभाऽस्ते

 मराठी साहित्यात नव्याने मुखरित झालेल्या जंगलच्या बोलीचा वेध, वनवासी साहित्य म्हणजेच "आदिवासी जगण्याचा हा आरसा" या ग्रंथातून डॉ. उल्का शेवकर-निंबाळकर यांनी साकल्याने घेतला आहे. मराठी साहित्याच्या विविध प्रवाहातील मौलिक आणि जोरकस ठरू लागलेल्या या वनवासी साहित्य प्रवाहाचा उदय आणि विकास येथे नोंदविला आहे. वनवासी साहित्याच्या मूलगामी प्रेरणा प्रारंभी विस्ताराने जाणून घेऊन त्याची चर्चा डॉ. उल्का यांनी केली आहे. वनवासींनी वैपुल्याने आणि प्राधान्याने आपल्या जगण्याचा हुंकार आणि आलेख कविता लिहूनच मांडला, त्याचा यथोचित परामर्श ग्रंथातील बहुसंख्य पानांतून स्वाभाविक म्हणूनच घेतला आहे. त्याचप्रमाणे वनवासी ललित साहित्यालाही त्याच्या मोजक्या आवाक्या प्रमाणे मोजक्याच पृष्ठात मार्मिक न्याय दिला आहे.

 "आदिवासी साहित्य आणि दिशा' या ग्रंथाच्या जुळ्या भावंडात संकलित, माहितीपर वैचारिक साहित्यधनाच्या अभ्यासपूर्ण विवेचनाबरोबरच लेखिकेने भाषा, जागतिकीकरण, देशीवाद, पर्यावरण या मुद्द्यांच्या संदर्भात वनवासी साहित्याचे योगदान अधोरेखीत केले आहे. त्याचप्रमाणे वनवासी साहित्याच्या पुढील वाटचालीचे सकारात्मक भाकीतही पटण्याजोगे मांडले आहे.

 डॉ. उल्का शेवकर-निंबाळकर यांनी वनवासी या विषयाच्या निवडीपासूनच आपली चोखंदळ दृष्टी दाखविली आहे. वस्तुत: स्पर्धात्मक परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या संशोधकाला आपल्या अभ्यासासाठी विविध विषय आवाहन करतात, आणि आव्हाने देत असतात, परंतु डॉ. उल्का यांनी सर्वसामान्य, मागे राहिलेल्या, अलक्षित समाजाची

११७