पान:विश्व वनवासींचे.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाकारली. इंग्रजांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये धुमसणारा राग उसळून आला. त्याला अन्यायाची चीड होती. त्याने स्वत:ची टोळी बनवली आणि इंग्रजांविरुद्ध उठाव केला. महादेव कोळी समाजाचा तो नेता बनला. १८३८ मध्ये त्याने रतनगड व सनगर किल्ल्याच्या टापूमध्ये क्रांतिकार्य आरंभले. त्यांचा संघर्ष मोडून काढण्याचा प्रयत्न मॅकिन्टोशने त्याच्यापरीने केला. रामजी भांगरे व गोविंदराव खाडे या किल्लेदाराने रतनगड सांभाळला. रामजी भांगरे राघोजीचे वडील होते. वडिलांचा क्रांतिकार्याचा वसा राघोजीने जणू जीवनव्रती बनून जपला. मारवाडी, वाणी सावकारांनी शेतसारा वसूलीचा जाच केला. वनवासींना कर्जबाजारी करून जमिनी हिसकावून घेतल्या. चिडून राघोजीने इंग्रजांचा आणि मारवाड्यांचा बंदोबस्त केला. त्याचा दरारा फार मोठा होता. त्यांना त्याने चांगला धडा शिकविला. ब्रिटिशांना राघोजी भांगरेला पकडून देणाऱ्यास रुपये ५०००/-चे इनाम १८४३ साली घोषित करावे लागले. राघोजीच्या कुटुंबियांना इंग्रजांनी आतोनात छळले. राघोजीचा हा लढा १८४८ पर्यंत अव्याहतपणे चालला. ब्रिटिशांना त्याने जेरीस आणले. कॅप्टन 'गेल'च्याही हाती तो लवकर लागेना. पण शेवटी २ जानेवारी १८४८ला रक्तपात आपल्यासाठी होतो हे लक्षात घेऊन त्याने स्वत:ला कॅप्टन गेलच्या स्वाधीन केले. राघोजीला एकतर्फी सुनावणीत फाशीची शिक्षा झाली. २० वर्षांचा हा लढा अखेरी थांबला. राघोजीने वीराचे मरण पत्करले आणि २ मे १८४८ला या महान लढवय्या क्रांतिकारकाला फाशी दिले.

 अशी या सह्याद्रीच्या वाघाची अदम्य झुंझार कहाणी श्री. भाऊसाहेब नेहरे यांनी तुम्हा आम्हा सर्वांसाठी सादर केली आहे. वाचक, अभ्यासक, इतिहास संशोधक आणि संपूर्ण समाज त्यांच्या प्रयत्नाचे खुल्या मनाने स्वागत करतील असा मला विश्वास आहे. श्री.भाऊसाहेब नेहेरे यांचे मी मनापासून या प्रथम प्रकाशनाबद्दल अभिनंदन करतो. आणि फारसा अधिकार नसूनही मला प्रस्तावना लिहिण्यास उद्युक्त केले त्याबद्दल त्यांचे ऋण मान्य करतो.

***

११६
विश्व वनवासींचे